महाळुंगे- माण रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात हिंजवडी आयटी पार्कमध्ये मूक मोर्चा

पुणे, ६ सप्टेंबर २०२६ : म्हाळुंगे-मान परिसरातील रस्त्यांची दुरवस्था, वाढती वाहतूक कोंडी, पादचारी सुरक्षेचा अभाव आणि अपुऱ्या मूलभूत सुविधांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रविवारी हिंजवडी आयटी पार्क परिसरात शांततापूर्ण मूक मोर्चा काढण्यात आला. म्हाळुंगे टाउनशिपमधील मोठ्या संख्येने रहिवासी या मोर्चात सहभागी झाले होते. नागरिकांनी घोषणाबाजीऐवजी शांततेच्या मार्गाने आपल्या मागण्या प्रशासनापर्यंत पोहोचविल्या.

म्हाळुंगे टाउनशिपमधील अनेक नागरिक हिंजवडी आयटी पार्कमध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे म्हाळुंगे-मान रस्ता हा केवळ स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाचा मार्ग नसून हिंजवडी आयटी पार्कला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. बाणेर, पाषाण, सूस, कोथरूड तसेच परिसरातून हिंजवडीकडे जाणारे अनेक नागरिक आणि आयटी कर्मचारी या मार्गाचा वापर करतात. हा मार्ग सक्षम झाल्यास वाकड पुलाच्या दिशेने होणाऱ्या वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होऊ शकते.मात्र, सध्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे, अपुरी पादचारी सुविधा, अपुरी प्रकाशव्यवस्था आणि वाहतूक नियोजनाचा अभाव असल्याने नागरिकांना दररोज मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः पादचारी, विद्यार्थी, दुचाकीस्वार आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

म्हाळुंगे टाउनशिपमधील रहिवाशांकडून गेल्या जवळपास दोन महिन्यांपासून पुणे महानगरपालिकेकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. पत्रव्यवहार, निवेदने, अधिकाऱ्यांच्या भेटी आणि प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती देऊनही अपेक्षित वेगाने प्रत्यक्ष काम सुरू झाले नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, २०१७ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या म्हाळुंगे-मान टाउनशिपच्या नियोजनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात भविष्यात मोठ्या प्रमाणात नागरी विकास अपेक्षित आहे. वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या लक्षात घेता राधा चौक-म्हाळुंगे-मान मार्ग भविष्यात हिंजवडीच्या वाहतूक व्यवस्थेतील महत्त्वाचा दुवा ठरू शकतो. त्यामुळे आजच या रस्त्याचे नियोजन आणि विकास करणे गरजेचे आहे.

PMRDA-PMC हस्तांतरण प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची मागणी: महाळुंगे परिसरातील रस्ते व पायाभूत सुविधांच्या विकासासाठी PMRDA आणि पुणे महानगरपालिका यांच्यातील हस्तांतरण प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. प्रशासकीय अधिकारक्षेत्र आणि हस्तांतरणाच्या प्रक्रियेमुळे विकासकामांना आणखी विलंब होऊ नये, अशी भूमिका रहिवाशांनी मांडली.

See also  महाळुंगे येथे बेलएअर सोसायटीत गणेशोत्सव उत्साहात साजरा

महाळुंगे माण रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. मागील काही दिवसांत रस्त्याच्या दुरवस्थेशी संबंधित अपघातांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. ११ वर्षीय मुलगा आणि २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याच्या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र चिंता निर्माण झाली आहे. त्यामुळे केवळ खड्डे बुजविण्याऐवजी दर्जेदार रस्ता, सलग व सुरक्षित फुटपाथ, पुरेशी स्ट्रीट लाईट व्यवस्था, योग्य वाहतूक नियंत्रण, जड वाहनांवर प्रभावी नियंत्रण आणि अपघातप्रवण ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाय तातडीने करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली.

नागरिकांच्या प्रमुख मागण्या
VTP Circle परिसरात वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेऊन एकेरी वाहतूक व्यवस्था लागू करावी, DPS शाळेपर्यंत सलग आणि सुरक्षित फुटपाथ तयार करावा, Hill Side 3 समोरील रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करून तो वाहतुकीसाठी खुला करावा, तसेच Mercedes-Benz परिसरातून येणारा पर्यायी रस्ता लवकर सुरू करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

आश्वासन नको, आता प्रत्यक्ष काम हवे”“म्हाळुंगे-मान रस्त्याची दयनीय अवस्था आणि हिंजवडी आयटी पार्कला जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग आज रहिवासी व रोजच्या प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहे. नागरिक आणि आयटी व्यावसायिकांनी अनेक वेळा आंदोलने, निदर्शने आणि मूक मेणबत्ती मोर्चाच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, अद्याप अपेक्षित कार्यवाही झालेली नाही. आणखी निष्पाप जीव जाण्यापूर्वी प्रशासनाने रस्त्याचे तातडीने पुनरुस्तीकरण करावे. आश्वासन नको, आता प्रत्यक्ष काम हवे!” अशी प्रतिक्रिया शिक्षिका सुरभी जोशी यांनी व्यक्त केली.

“नवीन गावे केवळ महानगरपालिकेत समाविष्ट करून त्यांचा प्रत्यक्ष विकास वर्षानुवर्षे लांबणार असेल, तर अशा पद्धतीचा पुनर्विचार करणे गरजेचे आहे. नागरिकांना केवळ महानगरपालिकेत समावेश नको, तर नियोजनबद्ध आणि प्रत्यक्ष विकास हवा आहे,” असे Siemensचे Senior Software Engineer विकास पवार यांनी सांगितले.

“म्हाळुंगे-मान रोड हा आयटी हबला जोडणारा तथाकथित ‘हाय-टेक’ परिसर म्हणून विकसित होत असताना प्रत्यक्षात नागरिकांच्या वाट्याला खड्डे, चिखल, अंधार आणि तासन्तास होणारी वाहतूक कोंडी आली आहे. नियमित कर भरूनही मूलभूत आणि सुरक्षित रस्ता न मिळणे ही अत्यंत गंभीर बाब आहे,” अशी प्रतिक्रिया TCSचे गणेश रोकडे यांनी दिली.

See also  गारटेक्स-टेक्स प्रोसेस इंडिया प्रदर्शनाचे वस्त्रोद्योग मंत्री यांच्या हस्ते उद्घाटन

तर व्ही.टी.पी. एथेरियसचे श्री. अत्तार एस. एस. यांनी VTP Circle परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी एकेरी वाहतूक व्यवस्था, DPS शाळेपर्यंत सुरक्षित फुटपाथ तसेच Hill Side 3 व Mercedes-Benz परिसरातील पर्यायी रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली.

आयुक्तांनी प्रत्यक्ष पाहणी करावी
नागरिकांनी पुणे महापालिका कार्यालयात दोन-तीन वेळा प्रत्यक्ष भेटी देऊन समस्या मांडल्या आहेत. मात्र, प्रश्नाची गंभीरता लक्षात घेता पुणे महापालिका आयुक्तांनी स्वतः म्हाळुंगे-मान रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. कार्यालयीन अहवालांपेक्षा प्रत्यक्ष रस्त्यावर जाऊन परिस्थिती पाहिल्यास नागरिकांना दररोज भेडसावणाऱ्या समस्यांची तीव्रता स्पष्ट होईल, अशी त्यांची भूमिका आहे.