गुरुपौर्णिमा आणि ‘बाँड ओव्हर बाइट्स’ उत्साहात साजरा: गुणवंतांचा गौरव

पुणे : भारती विद्यापीठ्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर वुमन, पुणे येथे गुरुपौर्णिमेनिमित्त ‘बाँड ओव्हर बाइट्स’ या कार्यक्रमाचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. मंदार करमरकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ते मार्गदर्शन करताना म्हणाले की, गुरु-शिष्य परंपरा ही भारतीय संस्कृतीचा अमूल्य वारसा आहे. ज्ञान, संस्कार आणि परस्पर आदर यांच्या बळावरच समाजाची प्रगती घडते. अशा उपक्रमांमुळे संस्थेतील आपुलकी, सहकार्य आणि एकात्मतेची भावना अधिक दृढ होते.

याप्रसंगी प्राचार्य डॉ. प्रदीप जाधव म्हणाले की, गुरुपौर्णिमा हा गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र दिवस असून ‘बाँड ओव्हर बाइट्स’सारखे उपक्रम संस्थेतील आपुलकी, सहकार्य आणि सकारात्मक कार्यसंस्कृती अधिक दृढ करतात.

कार्यक्रमात ‘प्रिन्सिपल ऑफ द इयर’ पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल प्राचार्य डॉ. प्रदीप जाधव यांचा गौरव करण्यात आला. गणित विषयात पीएच.डी. पदवी संपादन केल्याबद्दल डॉ. संतोष मिटकरी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच एमआयटी पुणे येथे आयोजित राष्ट्रीय परिषदेत कृत्रिम बुद्धिमत्ता विषयावरील संशोधन सादरीकरणासाठी द्वितीय पारितोषिक मिळवल्याबद्दल प्रा. रोशनादेवी सापकळ यांचाही सन्मान करण्यात आला.

पुणे विद्यापीठाच्या केंद्रीय मूल्यमापन प्रक्रियेत प्रथम वर्ष अभियांत्रिकी व एम.ई.च्या उत्तरपत्रिकांचे विक्रमी वेळेत मूल्यमापन पूर्ण केल्याबद्दल या केंद्राचे सहसंचालक प्रा. किरण येसुगडे, डॉ. केतकी माळगी, डॉ. शीतल पवार आणि डॉ. सुमती जगदाळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

यानंतर जुलै महिन्यात वाढदिवस असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. केक कापून सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या. त्यानंतर सर्वांनी अल्पोपहाराचा आस्वाद घेत मुक्त संवाद साधला.

या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. अविनाश पवार, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. अंजली कदम, प्रा. मुग्धा राणे आणि प्रा. पल्लवी नारखेडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सविता इटकरकर यांनी आपल्या खुमासदार शैलीत करून कार्यक्रमात रंगत आणली.

See also  पुण्यात पाच नवीन सायबर ठाण्यांच्या प्रस्तावास लवकर मंजुरी द्यावी -आ.सिद्धार्थ शिरोळे

कृतज्ञता, सन्मान, आपुलकी आणि सहकार्याची भावना अधिक दृढ करणारा ‘बाँड ओव्हर बाइट्स’ हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला.