अपूर्ण कामांचे उद्घाटन कशासाठी? बाणेरमध्ये मेट्रोविरोधात राजकीय पक्षांचे आंदोलन; कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

बाणेर :  शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नसतानाही मेट्रो सेवेचे उद्घाटन करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ बाणेर येथे विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि स्वाभिमानी शेतकरी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभागी होत सरकारच्या निर्णयाचा निषेध केला. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले.

स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश बालवडकर म्हणाले, केंद्र सरकारच्या विविध विभागांच्या आवश्यक मंजुऱ्या अद्याप मिळालेल्या नाहीत. बाणेर-बालेवाडी परिसरातील सहा मेट्रो स्थानकांची कामे अद्याप अपूर्ण आहेत. असे असताना अपूर्ण कामांचे उद्घाटन करण्याचा घाट घातला जात आहे. या प्रकाराचा आम्ही तीव्र निषेध करीत आहोत.

आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे म्हणाले, बाणेर-बालेवाडी परिसरातील अनेक विकासकामे अर्धवट अवस्थेत आहेत. त्यात आता मेट्रोच्या अपूर्ण कामांची भर पडली आहे. स्थानिक आमदार कॅबिनेट मंत्री असूनही स्वतःच्या मतदारसंघातील अपूर्ण कामांकडे दुर्लक्ष केले जात आहे. नागरिकांना प्रत्यक्ष सुविधा मिळण्यापेक्षा उद्घाटनाला अधिक महत्त्व दिले जात असल्याची टीका त्यांनी केली.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश बालवडकर, आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे, काँग्रेस पक्षाचे लोक अध्यक्ष ओम बांगर, सामाजिक कार्यकर्ते अमर लोंढे, लक्ष्मण पाडाळे, रोहित धेंडे आदी उपस्थित होते.

अपूर्ण कामे पूर्ण करून मेट्रो सेवा नागरिकांसाठी पूर्ण क्षमतेने सुरू करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

See also  अमली पदार्थांच्या विळख्यात तरुणाई  गंभीर बाब - प्रा.डॉ. मिलिंद भोई