पुणे : बावधन परिसरातील वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील वाढती वीज गरज लक्षात घेता प्रस्तावित २२० के.व्ही. वीज उपकेंद्राच्या उभारणीच्या मागणीला आता सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. या संदर्भात नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन वीज उपकेंद्राबाबत सविस्तर चर्चा केली.
बावधन परिसरातील नागरिकांची वाढती वीज गरज, सध्याच्या वीजपुरवठ्यावरील वाढता ताण तसेच भविष्यातील वाढती मागणी लक्षात घेता २२० के.व्ही. वीज उपकेंद्राची आवश्यकता असल्याचे वेडेपाटील यांनी महसूल मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
यावेळी महसूल मंत्री बावनकुळे यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली. त्यामुळे वीज उपकेंद्रासाठी आवश्यक असलेल्या जमीन उपलब्धतेच्या प्रक्रियेला आता गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मौजे बावधन बुद्रुक, ता. मुळशी, जि. पुणे येथील सर्वे नं. २३/३ मधील २ हेक्टर ४२.५५ आर संपूर्ण सरकारी गायरान जमीन २२० के.व्ही. वीज उपकेंद्रासाठी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही प्रस्तावित आहे.
हे वीज उपकेंद्र कार्यान्वित झाल्यास बावधन, कोथरूड तसेच पुणे शहराच्या पश्चिम भागातील वीजपुरवठा अधिक सक्षम, स्थिर आणि विश्वासार्ह होण्यास मदत होणार आहे. वाढती गृहसंकुले, व्यावसायिक आस्थापना आणि भविष्यातील नागरी विस्ताराच्या पार्श्वभूमीवर या उपकेंद्राचे महत्त्व अधिक वाढले आहे.
महसूल मंत्र्यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे बावधनच्या २२० के.व्ही. वीज उपकेंद्राच्या कामाचा मार्ग सुकर होण्याची शक्यता असून, हे उपकेंद्र लवकरात लवकर प्रत्यक्षात यावे यासाठी दिलीप वेडेपाटील यांच्याकडून पुढील कार्यवाहीसाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार आहे.
















