पुणे : भारती विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू तंत्रनिकेतन, पुणे मध्ये प्रथम वर्ष इंजिनीरिंग डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांकरिता नुकतेच ‘इंडक्शन प्रोग्रॅम’ चे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. नवीन वातावरणाशी जुळवून घेता यावे आणि तंत्रशिक्षणाची तोंड ओळख व्हावी, या उद्देशाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विविध विभागांमधील प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान याप्रसंगी करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, पुणे येथील सहाय्यक सहसंचालक श्री. एस. पी. दाते आणि श्री. प्रतिक भरणे, प्रादेशिक संचालक, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, पुणे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषिकेश देशमुख होते. प्रमुख पाहुणे श्री. एस. पी. दाते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तंत्रशिक्षणातील नवीन संधी आणि भविष्यातील आव्हाने यावर प्रकाश टाकला. तसेच डिप्लोमाचे शिक्षण घेताना विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक ज्ञानावर अधिक भर देणे का गरजेचे आहे, हे पटवून दिले. दुसरे प्रमुख पाहुणे श्री. प्रतिक भरणे यांनी पर्यावरण संवर्धन, प्रदूषण नियंत्रण आणि शाश्वत विकास यामध्ये अभियंत्यांची असणारी भूमिका स्पष्ट केली.
प्राचार्य श्री. ऋषिकेश देशमुख यांनी आपल्या भाषणात महाविद्यालयाच्या गौरवशाली परंपरेची माहिती दिली आणि विद्यार्थ्यांनी शिस्त, कठोर परिश्रम आणि सातत्य यांच्या जोरावर आपले भविष्य उज्ज्वल करावे, असा संदेश दिला.
उपप्राचार्य श्री. अमितराव पाटील यांनी सर्व विभागांच्या प्रमुखांची ओळख करून दिली, श्री. तानाजी कणसे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे आयोजन सौ. सुजाता पाटील व हुमॅनिटीज अँड सायन्स विभाग यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन द्वितीय वर्षाचे विद्यार्थी कु.आर्या टिकेकर आणि कु. प्रज्ञेश आल्हाट यांनी केले. कार्यक्रमाला प्रथम वर्षाचे सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक आणि महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















