बावधनमध्ये नाल्यावर पूल उभारणीचा वाद; महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून नागरिकांना धमकी दिल्याचा आरोप

बावधन,दि.२१ (प्रतिनिधी) – बावधन बुद्रुक येथील नाल्यावर उभारण्यात आलेला लोखंडी पूल हा महानगरपालिकेचा आहे की खासगी व्यक्तीने उभारला आहे, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित निर्माण झाला आहे.‌ परंतु ह्या पुलाचे काम पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत काल २० ऑगस्ट करण्यात आले आहे.

बावधन येथील सर्व्हे नंबर ३६ व ३७ च्या मधून शिवकालीन नैसर्गिक नाला वाहत असून हा नाला अनेक दशकापासून वाहत असल्याचे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे.  बावधन बुद्रुक येथील दोन्ही सर्व्हे नंबरमध्ये इमारत विकसित करण्याचे काम सुरू आहे. सर्व्हे नंबर ३७ मध्ये सुरू असलेले इमारतीचे काम अंतिम टप्यात पोहचलेले असून सर्व्हे नंबर ३७ मधील कामगार, अधिकारी यांना ये – जा करण्यासाठी तसेच बांधकाम साहित्य ने आण करण्यासाठी सर्व्हे नंबर ३६ मध्ये असलेल्या नाला पार करत प्रस्तावित डीपी रस्त्यावरून जावे लागत आहे. येथील नाला बंदिस्त नसून नाल्यावर पूल देखील नसल्यामुळे मुख्य रस्त्यावर जाणे अडचणीचे ठरत होते.

काल २० ऑगस्टला दुपारी पथ विभागाचे मुख्य अभियंता राजेश बनकर, बांधकाम विकास विभाग झोन ३ चे उपअभियंता भास्कर हांडे, बांधकाम निरीक्षक अजय फाले, पालिकेचे कर्मचारी व सुरक्षा रक्षकांचा मोठा लवाजम्यासह जागेवर दाखल होत प्रस्तावित डीपी रस्त्यावरील पत्र्याचे शेड काढण्यास सुरुवात केली. पत्रा शेड कारवाई पूर्ण करत पुढे सर्व्हे नंबर ३७ मधील इमारतीच्या समोरील नाल्यावर लोखंडी पूल टाकण्यास सुरुवात केली. यावेळी नागरिकांनी त्यांना पूल उभारण्याची परवानगी आहे का ? अशी विचारणा केली असता, तुम्ही जास्त बोलू नका सरकारी काम आहे असे उत्तर अधिकाऱ्यांनी दिले. तसेच कामाला अडवणूक करू नका अन्यथा तुमच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करू अशी धमकी दिल्याचे नागरिकांनी सांगितले.

हा पूल महापालिकेने उभा केला की खाजगी व्यक्तीने केला हे समजणे कठीण आहे परंतू महापालिकेच्या परवानगीने व देखरेखीखाली उभारण्यात आला आहे का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

See also  हडपसर विधानसभा मतदार संघातील माघार घेतलेल्या बहुतांश अपक्षांचा महाविकास आघाडीला पाठिंबा

महापालिकेच्या जागेवर अथवा नैसर्गिक नाल्यावर कोणतेही बांधकाम करण्यासाठी आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या आहेत का, लोखंडी पुलाच्या उभारणीसाठी महापालिकेच्या निधीचा वापर झाला आहे का, तसेच पुलाची देखभाल व भविष्यातील जबाबदारी कोणाची राहणार, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.