अनाथ मुलांच्या कागदपत्रांसाठी शासनाने कायद्यात सवलत द्यावी सामाजिक कार्यकर्ते यशवंत गोसावी यांची मागणी

पुणे : महाराष्ट्रातील अनेक अनाथ आश्रमांमध्ये राहणाऱ्या अनाथ मुलामुलींना आधारकार्ड, पॅनकार्ड तसेच अन्य शासकीय कागदपत्रे काढताना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. आई-वडील किंवा नातेवाईकांशी संबंधित पुरावे उपलब्ध नसल्याने या मुलांना शासकीय कागदपत्रांपासून वंचित राहावे लागते. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने अनाथ मुलांसाठी कागदपत्रांच्या नियमांमध्ये आवश्यक ती सवलत द्यावी, अशी मागणी नाशिक येथील सामाजिक कार्यकर्ते यशवंत गोसावी यांनी केली.

शिवसह्याद्री चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पुणे-सातारा रस्त्यावरील अण्णाभाऊ साठे सभागृहात आयोजित कार्यक्रमात नाशिक येथील शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्टला ‘शिवसह्याद्री आधारवड पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक हेमंत धुमाळ आणि संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. संस्थेचे संचालक यशवंत गोसावी व पूनम गोसावी यांनी पुरस्कार स्वीकारला.

रोख २५ हजार रुपये, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. अनाथ, निराधार तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांसाठी कार्य केल्याबद्दल संस्थेचा गौरव करण्यात आला.

यावेळी बोलताना यशवंत गोसावी म्हणाले, “अनेक अनाथ मुलामुलींचे आधारकार्ड व पॅनकार्ड काढण्यासाठी शासकीय कार्यालयात गेल्यानंतर त्यांच्या आई-वडिलांचे किंवा इतर नातेवाईकांचे पुरावे मागितले जातात. मात्र, अनेक मुलांच्या आई-वडिलांचे निधन झालेले असते किंवा त्यांचा ठावठिकाणा नसतो. त्यामुळे आवश्यक पुरावे उपलब्ध होत नाहीत. परिणामी या मुलांना आधारकार्ड, पॅनकार्ड आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे मिळण्यात अडचणी निर्माण होतात.”

“या परिस्थितीचा थेट परिणाम मुलांच्या शिक्षणावर, भविष्यातील संधींवर आणि शासकीय योजनांच्या लाभावर होतो. त्यामुळे अनाथ मुलांची परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र व राज्य सरकारने संबंधित कायदे व नियमांमध्ये सवलत देऊन त्यांना कागदपत्रे मिळण्याची सोपी प्रक्रिया उपलब्ध करून द्यावी,” अशी मागणी गोसावी यांनी केली.

या कार्यक्रमात उच्च शिक्षणासाठी १ कोटी ७५ लाख रुपयांच्या ठेवीतून मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेतून ९५ विद्यार्थ्यांना सुमारे ११ लाख रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.

See also  "नमो चषक" स्पर्धाँमुळे विविध क्रीडाप्रकारांना व स्थानिक खेळाडूंना वाव - ना. चंद्रकांतदादा पाटील

यावेळी शिवसह्याद्री चॅरिटेबल फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे, एम.ई.चे अध्यक्ष विक्रम गायकवाड, बढेकर ग्रुपचे संचालक प्रवीण बढेकर, सोपान वांजळे, सेवानिवृत्त मुख्य अभियंता राजेंद्र रहाणे, फाउंडेशनचे विश्वस्त विक्रमसिंह लावंड, नितीन साळुंके, सागर शेडगे, अनिल शिंदे, एस.एम. गिरमकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना राजेंद्र कोंढरे म्हणाले, “मराठा आरक्षण मिळेल तेव्हा मिळेल; मात्र सवलत मिळाली पाहिजे. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मराठा आरक्षण आणि सवलतीची सांगड घालण्याची परिस्थिती आहे. आपल्याकडे जे आहे ते इतरांना देण्याची वृत्ती प्रत्येकाने ठेवली पाहिजे.”

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सागर शेडगे यांनी केले, तर नितीन साळुंके यांनी उपस्थितांचे आभार मानले.