गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी महापालिकेत गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक ; नागरिकांच्या सूचना व मागण्यांवर सकारात्मक कार्यवाहीचे महापौरांचे आश्वासन

पुणे : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या वतीने उत्सवाची पूर्वतयारी, नियोजन तसेच गणेश मंडळांच्या विविध मागण्यांबाबत आज महापालिकेत गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांची बैठक आयोजित करण्यात आली. गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी विविध विषयांवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीस महापौर सौ. मंजुषा दीपक नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, सभागृह नेते गणेश बिडकर, विरोधी पक्षनेते निलेश निकम, पक्षनेते रामचंद्र कदम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) पक्षनेते सोपान चव्हाण, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षनेते नितीन गावडे, महापालिका आयुक्त नवल किशोर राम, धीरज घाटे, पोलीस सहआयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त संजय पाटील यांच्यासह महापालिका अधिकारी, विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

बैठकीत गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी ध्वनिक्षेपक व साऊंड सिस्टीमची नियमावली, वाहतूक नियोजन, ‘एक खिडकी योजना’, गणेश विसर्जनाची वेळ वाढविणे, मंडळांना आवश्यक परवानग्या व सुविधा यासह विविध मागण्या आणि सूचना मांडल्या. गणेशोत्सव काळात मंडळे तसेच नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये, यासाठी महापालिका आणि पोलिस प्रशासनाने समन्वयाने काम करण्याची मागणी करण्यात आली.

महापौर सौ. मंजुषा नागपुरे यांनी मंडळांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत विविध उपाययोजनांची माहिती दिली. गणेशोत्सव राज्योत्सव म्हणून साजरा करण्याच्या दृष्टीने विशेष डॉक्युमेंट्री तयार करण्यात येणार असून, मंडळांना विविध परवानग्या मिळविण्यासाठी ‘एक खिडकी योजना’ राबविण्यात येणार आहे. तसेच शहरातील प्रत्येक गणेश मंडळाची माहिती डिजिटल मॅपिंगद्वारे वेबसाइटवर उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

गणेशोत्सवाच्या काळात गर्दीचे नियोजन व नियंत्रण करण्यासाठी पोलिस प्रशासनाला आवश्यक सूचना देण्यात आल्या असून, उत्सवापूर्वी शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची कार्यवाही पूर्ण करण्याचे आश्वासनही देण्यात आले. भाविक आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या वाढविण्यात येणार असून, महिला भाविकांसाठी ‘हिरकणी कक्ष’ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

See also  पाणंद रस्त्यांचे ग्रामीण मार्गात रुपांतरासाठी सकारात्मक विचार करणार- ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन

गणेश मंडळांना आवश्यक जाहिरात व प्रसिद्धीसंदर्भात आकाशचिन्ह विभागाकडून शुल्क आकारू नये, याबाबतही सकारात्मक चर्चा करण्यात आली. तसेच ‘ड्रग्समुक्त पुणे’ अभियान राबविण्याच्या दृष्टीने पुढाकार घेण्यात येणार आहे. मंडळांच्या स्थानिक पातळीवरील तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी प्रत्येक प्रभागासाठी एका नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचेही नियोजन करण्यात आले. गणेशोत्सव काळात मेट्रोच्या तिकीट विक्रीदरम्यान नागरिकांना अडचणी येऊ नयेत यासाठी नेटवर्कची योग्य व्यवस्था करण्याच्या सूचना मेट्रो प्रशासनाला देण्यात आल्या. तसेच खाद्यपदार्थ विक्री आणि स्टॉलसाठी कोणतेही शुल्क आकारू नये, याबाबतही बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.

गणेशोत्सव हा पुण्याच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनातील महत्त्वाचा उत्सव असून, तो अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि पर्यावरणपूरक पद्धतीने पार पाडण्यासाठी पुणे महानगरपालिका, पोलिस प्रशासन, गणेश मंडळे आणि नागरिकांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी मांडलेल्या सूचना व मागण्यांचा सकारात्मक विचार करून आवश्यक त्या उपाययोजना वेळेत करण्यात येतील, असे आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आले. त्यामुळे आगामी गणेशोत्सवाच्या नियोजनाला गती मिळणार असून, नागरिक आणि गणेश मंडळांना आवश्यक सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यावर महापालिकेचा भर राहणार आहे.