पुणे : आम आदमी पार्टी (आप) चे धोरणतज्ञ ‘जस्मिन शाह’ यांनी लिहिलेले, ‘केजरीवाल मॉडेल’ या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन आज पुण्यात भारत इतिहास संशोधन मंडळ येथे झाले. मूळ इंग्रजीत ‘द दिल्ली मॉडेल: अ बोल्ड न्यू रोड मॅप टू बिल्डिंग अ डेव्हलप्ड इंडिया’ या नावाने प्रकाशित या पुस्तकात दिल्लीतील आप सरकारने राबवलेल्या शासन आणि धोरणात्मक सुधारणांचे परीक्षण आणि संशोधनावर आधारित लिखाण आहे.
यावेळी स्वतः लेखक जस्मिन शाह, माजी प्रशासकीय अधिकारी महेश झगडे, सकाळचे संपादक सम्राट फडणीस, आप चे प्रभारी व माजी आमदार प्रकाश जारवाल, उपाध्यक्ष विजय कुंभार व मधुश्री पब्लिकेशनचे शरद अष्टेकर हे प्रकाशनानंतरच्या चर्चासत्रात सहभागी झाले होते.
दिल्लीतील आप सरकारचे आणि आताचे पंजाब मधील केजरीवाल मॉडेल हे केवळ पायाभूत सुविधांवर आधारित पारंपरिक मॉडेलऐवजी, मानवी भांडवल विकासावर केंद्रित असलेल्या “जनता-केंद्रित” विकासाचे मॉडेल असून या पुस्तकात सहा प्रमुख क्षेत्रे: शिक्षण, आरोग्यसेवा (जसे की मोहल्ला क्लिनिक्स), सार्वजनिक वाहतूक, वीज, पाणी आणि वायू प्रदूषण या क्षेत्रांमधील धोरणांची रचना, अंमलबजावणी आणि परिणामांचे विश्लेषण केले आहे. या पुस्तकात दिल्लीतील आपच्या मॉडेलच्या आर्थिक पायाचे विश्लेषण आणि गुजरात मॉडेलसारख्या इतर प्रारूपांशी त्याची तुलना केलेली आहे. असे जस्मिन शहा यांनी सांगितले.माजी आमदार प्रकाश जारवाल यांनी याबाबत दिल्लीतील पाणी पुरवठ्याचा अनुभव सांगत सार्वजनिक कल्याणकारी आणि भ्रष्टाचारविरोधी धोरणांना हा एक दूरदृष्टीचा आराखडा असल्याचे नमूद केले.
भारतातील विकासाच्या अधोगतीला राजकारणी आणि नोकरशहा कारणीभूत असल्याचे नमूद करत मॉडेल डिझाईन करणे सोपे असते परंतु त्याची अंमलबजावणी करणे हे अत्यंत कठीण असते आणि दिल्लीमध्ये अपयशी माजी नोकरशहाचा सल्लागार म्हणून वापर न करता यातील विविध तज्ञांच्या सहाय्याने हे मॉडेल बनवले गेले हे पण एक वेगळे वैशिष्ट्य असल्याचे नमूद केले.
यावेळी सम्राट फडणीस यांनी महाराष्ट्राच्या आणि प्रामुख्याने पुण्यासारख्या ठिकाणी चालू असलेल्या एक लाख कोटींच्या विविध प्रकल्पांच्या प्राथमिकतेविषयीच शंका व्यक्त करीत येथील सार्वजनिक वाहतूक तसेच महाराष्ट्रातील सरकारी शाळांची अवस्था, दवाखान्यांची अवस्था दयनीय असून आता आयुक्त,वरिष्ठ सरकारी अधिकारी जमिनीवर उतरत नाहीत असे सखेद नमूद केले. विजय कुंभार यांनी पन्नास वर्षांपूर्वीची आपली शाळा अजूनही तशीच असल्याचे सांगत यासाठी निधीच उपलब्ध केला जात नाही अशी टिप्पणी केली.
अभिजीत मोरे यांनी सूत्र संचालन केले. यावेळेस आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत,भूषण ढाकुलकर,मनीष मोडक,संदीप देसाई, सुनीता काळे, अमित म्हस्के, रविराज काळे, संजय कोणे, वसंतराव डोके, सुदर्शन जगदाळे, धनंजय बेनकर, सुजित आगरवाल आदी उपस्थित होते.
















