बालेवाडी : बालेवाडी येथील स्मशानभूमीजवळ असलेल्या KAKKAD AVIDA अपार्टमेंटमधील २२व्या मजल्यावरील बी विंग मधील फ्लॅट नंबर2208 ला आग लागल्याची घटना घडली. फ्लॅटमध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेत फ्लॅटमधील घरगुती साहित्य जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घटनेची माहिती मिळताच बाणेर, पाषाण आणि औंध परिसरातील अग्निशामक दलाच्या पथकांनी अग्निशामक दलाचे स्टेशन अधिकारी शिवाजी मेमाणे यांच्या नेतृत्वात तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून चार अग्निशामक बंब व एक पाण्याचा टँकर च्या साह्याने आग आटोक्यात आणली. आगीचे नेमके कारण आणि नुकसानीबाबत पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, बाणेर-बालेवाडी परिसरात टेरेसवरील फ्लॅट तसेच टेरेसवर सुरू असलेल्या हॉटेल्सना आग लागण्याच्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. उंच इमारतींमधील अग्निसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने परिसरातील उंच इमारतींचे अग्निसुरक्षा ऑडिट करून अग्निशमन यंत्रणा, आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग आणि इतर सुरक्षा व्यवस्थांची तपासणी करावी, अशी मागणी होत आहे. तसेच टेरेसवरील अनधिकृत बांधकामांची तपासणी करून नियमबाह्य बांधकामांवर तातडीने कारवाई करावी, अशीही मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
















