भारती विद्यापीठात नशामुक्त भारतासाठी युवा संवाद मेळा

कात्रज : नशा मुक्त युवा अभियान  १०० आठवडे संकल्प अभियान अंतर्गत “युवा संवाद मेळा” हा उपक्रम भारती विद्यापीठ्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर विमेन, पुणे येथे आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य, कल्याण आणि नशामुक्त जीवनशैलीबाबत जागरूकता निर्माण करणे हा होता.

या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी व वक्त्या डॉ. दुर्गा सातव होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना उत्तम आरोग्य राखण्याचे, चांगल्या सवयी अंगीकारण्याचे आणि व्यसनापासून दूर राहण्याचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या प्रेरणादायी भाषणाने विद्यार्थिनींनी नशामुक्त भारतासाठी शपथ घेतली.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप जाधव यांनी विद्यार्थिनींना प्रेरित केले. त्यांनी सांगितले की असे उपक्रमातून परिवर्तनशील आणि सर्वांगीण विकास साध्य होतो. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या उद्दिष्टांशी हे कार्यक्रम सुसंगत असून समाजहितासाठी उपयुक्त आहेत.

कार्यक्रमात १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. संवाद सत्रात आरोग्य जागरूकता, व्यसनाचे दुष्परिणाम आणि जबाबदार निर्णय घेण्याचे महत्त्व यावर चर्चा झाली. महाविद्यालयाच्या परिसरात काढलेल्या जनजागृती रॅलीत विद्यार्थ्यांनी नशामुक्त जीवनशैलीचा संदेश दिला. तसेच रस्त्यावर सादर केलेल्या नाट्यप्रयोगातून व्यसनमुक्तीचा संदेश प्रभावीपणे पोहोचवण्यात आला.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपप्राचार्य डॉ. सुवर्णा चोरगे व डॉ. अविनाश पवार, राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक डॉ. सविता इटकरकर, विद्यार्थी विकास मंडळ जिल्हा समन्वयक डॉ. कल्याणी चौधरी, तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. स्मिता जाधव आणि प्रा. आचल देशपांडे यांचे मार्गदर्शन लाभले.

युवा संवाद मेळा विद्यार्थ्यांच्या आणि प्राध्यापकांच्या नशामुक्त भारतासाठीच्या नव्या संकल्पाने संपन्न झाला. आरोग्य जागरूकता आणि व्यसनमुक्तीचा संदेश पसरवून जबाबदार, आरोग्यदायी आणि विकसित भारत घडविण्याचा संकल्प या कार्यक्रमातून दृढ झाला.

See also  कोथरुड येथील थोरात उद्यानात मूलभूत सुविधांचा अभाव असताना मोनोरेलचा अट्टाहास; "आप" ने केला निषेध