डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा;RFID तंत्रज्ञानाचे उद्घाटन

आकुर्डी : डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, आकुर्डी येथील मध्यवर्ती ग्रंथालयाच्या वतीने भारताचे माजी राष्ट्रपती व थोर शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त मध्यवर्ती ग्रंथालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. (श्रीमती) पी. मालती आणि अधिष्ठाता (प्रशासन) डॉ. एस. एस. सरनोबत यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्राचार्या डॉ. (श्रीमती) पी. मालती यांच्या हस्ते ग्रंथालयातील RFID (Radio Frequency Identification) तंत्रज्ञानाचे उद्घाटन करण्यात आले. या तंत्रज्ञानामुळे ग्रंथालयातील पुस्तकांचे व्यवस्थापन आणि ग्रंथालयीन कामकाज अधिक कार्यक्षम होण्यास मदत होणार आहे.

वाचन प्रेरणा दिनानिमित्त ग्रंथालयाचा नियमित वापर करून वाचनाची आवड जोपासणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना आणि तीन प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना ‘उत्कृष्ट वाचक पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थी गटातून बी.टेक. सिव्हिल अभियांत्रिकी विभागातील अविनाश गोळे आणि काशिद मोनिका विठ्ठल तसेच बी.टेक. मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागातील शिवम शेटे यांना सन्मानित करण्यात आले.

प्राध्यापक व कर्मचारी गटातून सिव्हिल अभियांत्रिकी विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. स्मिता पाटसकर, सहाय्यक प्राध्यापक सुनील पायघन आणि प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागातील सहाय्यक प्राध्यापिका श्रीमती कोमल देसाई यांना उत्कृष्ट वाचक पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कारार्थींना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश लांडे, ग्रंथपाल यांनी केले. त्यांनी उपस्थितांना मध्यवर्ती ग्रंथालयात उपलब्ध असलेल्या विविध ग्रंथसंपदा, ई-संसाधने आणि इतर ग्रंथालयीन सुविधांची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी तसेच प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी ग्रंथालयातील उपलब्ध संसाधनांचा अधिकाधिक उपयोग करावा आणि नियमित वाचनाची सवय जोपासावी, असे आवाहन करण्यात आले.

वाचनामुळे ज्ञानवृद्धी होते, विचारशक्ती विकसित होते आणि व्यक्तिमत्त्व घडण्यास मदत होते, हा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मध्यवर्ती ग्रंथालयातील कर्मचारीवर्गाने परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे महाविद्यालयात वाचनसंस्कृतीला चालना मिळण्यास मदत होणार आहे.

See also  योगीराज नागरी सहकारी पतसंस्थेचा 29 व्या वर्धापन दिनानिमित्त सोमवारी चहापान कार्यक्रमाचे आयोजन