पुणे ग्रँड टूरपेक्षा नागरिकांचे जीव महत्त्वाचे; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर स्पर्धा रद्द करून निधी विकासकामांसाठी वापरा!; स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश (तात्या) बालवडकर यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी

पुणे : महाराष्ट्रात दुष्काळसदृश परिस्थिती असताना, अनेक गावांमध्ये पाणीटंचाई भेडसावत असताना आणि पुणे शहरातील विकासकामे अपूर्ण असताना पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेवर कोट्यवधी रुपये खर्च करणे कितपत योग्य आहे, असा सवाल स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश (तात्या) बालवडकर यांनी उपस्थित केला आहे. ही स्पर्धा रद्द करून त्यासाठीचा निधी शहरातील रखडलेली विकासकामे पूर्ण करण्यासाठी आणि नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी वापरावा, अशी मागणी त्यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

बालवडकर यांनी निवेदनात बालेवाडी-पिंपरी-चिंचवड शहराला जोडणाऱ्या रस्त्याचे काम अपूर्ण असल्याकडे लक्ष वेधले आहे. या मार्गावरील पूल बांधूनही त्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. पुलावर धूळ उडत असताना राडारोडा टाकणे, कचरा साचणे आणि मातीचे ढिगारे टाकून रस्ता बंद करण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. परिसरात मोठ्या प्रमाणावर मोऱ्या व नाले असूनही त्यांची योग्य देखभाल होत नसल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले.

पुणे एक्स्प्रेस हायवे, महाळुंगे, हिंजवडी आणि आयटी पार्कला जोडणारा मुख्य डीपी रस्ताही पूर्णत्वास गेलेला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. या मार्गावर अपघात होत असून, शाळकरी दोन मुलांचा मोठ्या वाहनांमुळे मृत्यू झाल्याचा उल्लेख करत त्यांनी रस्ते सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला. संबंधित रस्त्यांची पाहणी करण्यासाठी अनेकांनी भेटी दिल्या; मात्र प्रत्यक्ष कामांना गती मिळत नसल्याची टीकाही त्यांनी केली.

याशिवाय, मूळ नद्यांचे गटारगंगेत रूपांतर होत असून बाणेर, बालेवाडी आणि महाळुंगे परिसरात डास व मच्छरांचा त्रास वाढत असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी घेताना योग्य मोबदला देण्याचा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

“स्पर्धेपेक्षा नागरिकांचे जीवन महत्त्वाचे”
पुणे ग्रँड टूर स्पर्धेवर खर्च करण्याऐवजी हा निधी रखडलेले रस्ते, पूल, ड्रेनेज व्यवस्था आणि इतर मूलभूत सुविधा पूर्ण करण्यासाठी वापरावा. नागरिकांचे जीवन सुरक्षित करणे आणि त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, हे प्रशासनाचे प्रथम कर्तव्य असल्याचे बालवडकर यांनी निवेदनात म्हटले आहे. या मागणीमुळे पुणे ग्रँड टूरच्या आयोजनावरील खर्च आणि शहरातील प्रलंबित विकासकामांना दिले जाणारे प्राधान्य याबाबत नव्याने चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे.

See also  शेतमाल विक्री व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी जागतिक तंत्रज्ञानाचा वापर करा - पणन मंत्री जयकुमार रावल

31 डिसेंबर पर्यंत नागरिकांची कामे पूर्ण न झाल्यास तसेच रस्ते पूर्ण झाल्यास ग्रँड टूर स्पर्धा होऊ देणार नाही असा इशारा स्वाभिमानी पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.