औंधच्या गोळवलकर गुरुजी शाळेत ‘आनंदी दिवाळी’ उत्साहात साजरी; विद्यार्थ्यांकडून प्रदूषणमुक्त दिवाळीची शपथ

औंध : पुणे महानगरपालिकेच्या औंध येथील इंग्रजी माध्यमाच्या गोळवलकर गुरुजी प्राथमिक विद्यालयात ‘आनंदी दिवाळी’ हा उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी फटाके न वाजवता प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ घेत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

दिवाळीत फटाक्यांमुळे होणारे हवा आणि ध्वनी प्रदूषण आरोग्यासाठी घातक ठरते. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण तसेच पशू-पक्ष्यांना याचा त्रास होतो, याची जाणीव विद्यार्थ्यांना करून देण्यात आली. यंदा फटाके न वाजवण्याबरोबरच मित्रमंडळी, नातेवाईक आणि कुटुंबीयांनाही प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला.

शाळेतील उपक्रमशील शिक्षिका अपराजिता कवितके यांनी विद्यार्थ्यांकडून रंगीबेरंगी कागदाचे आकर्षक आकाशकंदील तयार करून घेतले. तसेच विद्यार्थ्यांनी पणत्यांना विविध रंगांनी सजवून शाळेत दीपोत्सव साजरा केला. प्रदूषणमुक्त दिवाळीचा संदेश देणारी पोस्टर्स तयार करून त्याद्वारे पालकांनाही आवाहन करण्यात आले.

शाळेचे मुख्याध्यापक संतोष सुतार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना दिवाळीनिमित्त खाऊचे वाटप करण्यात आले. ज्युनिअर केजी ते इयत्ता आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सर्व शिक्षिकांनी विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये प्रदूषणमुक्त दिवाळी या विषयावर चित्रकला, रांगोळी आणि शुभेच्छापत्रे तयार करण्याच्या उपक्रमांचा समावेश होता. योगिता कोळपकर यांनी विद्यार्थ्यांसाठी विविध खेळांचे आयोजन केले. रमा सोनकांबळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्यासोबतच आनंदी, सुरक्षित आणि प्रदूषणमुक्त सण साजरे करण्याचा संदेश देण्यात आला. यावेळी सर्व पालकांनाही प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले.

See also  बारामती शिरूर व पुणे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या