राष्ट्रवादीला धोबीपछाड देत भाजपाचा पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिरकाव : अजितदादांना धक्का

पुणे : पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीवर अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीला 18 पैकी 13 जागा जिंकण्यामध्ये यश आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला स्थानिक पातळीवर हा एक मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी बंडखोर आणि भाजपच्या पॅनलची सत्ता आली आहे.

पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलचा राष्ट्रवादीच्या बंडखोरांनी भाजपच्या मदतीने धुव्वा उडवला आहे. या निवडणुकीत अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीला 18 पैकी 13 जागा जिंकण्यामध्ये यश आले आहे. तर 2 जागांवर राष्ट्रवादी पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनल विजयी झाले आहे. या व्यतिरिक्त 3 जागावर स्वतंत्र उमेदवार विजयी झाले आहेत.

बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये विजय मिळवत राष्ट्रवादीचे बाजार समिती वरील वर्चस्व कमी करण्यात भाजपा यशस्वी झाली असून भाजपाचा पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीवर झालेला शिरकाव हा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकी नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांनी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत आपला सहभाग घेतल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती.

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजपाचा शिरकाव झाल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये देखील भाजपाचा आत्मविश्वास अधिक वाढला आहे. तर राष्ट्रवादीच्या होम पिचवरच झालेला हा पराभव आगामी निवडणुकांमध्ये संघर्षात भर टाकणारा ठरणार आहे.

बाजार समितीच्या सेवा सहकारी मतदार संघातील सर्वच्या सर्व सात जागांवर अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीने बाजी मारली आहे. त्यामध्ये रोहिदास उंदरे, दिलीप काळभोर, प्रशांत काळभोर, राजाराम कांचन, प्रकाश जगताप, नितीन दांगट, दत्तात्रेय पायगुडे हे उमेदवार निवडून आले आहेत.

शेतकरी आघाडीचेच इतर मागासवर्ग गटातून शशिकांत गायकवाड, भटक्या विमुक्त मतदार संघातून लक्ष्मण केसकर, महिला राखीव मतदार संघातून मनिषा हरपळे व सारिका हरगुडे, तर ग्रामपंचायत मतदार संघातून सुदर्शन चौधरी व रवींद्र कंद हे उमेदवार विजयी झाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनेलला मात्र केवळ ग्रामपंचायत मतदारसंघातील दोन जागा मिळविण्यात यश मिळाले आहे. रामकृष्ण सातव आणि आबासाहेब आबनावे हे विजयी झाले आहेत.

See also  निरोगी शरीर ठेवण्यासाठी दररोज थोडा वेळ काढून योग करावा - चंद्रकांत पाटील

हमाल मापाडी मतदारसंघातून संतोष नांगरे यांनी ८८८ मते मिळवून विजय मिळवला. आडते व्यापारी गटातून जय शारदा गजानन पॅनलचे गणेश घुले आणि अनिरुद्ध भोसले विक्रमी मताधिक्याने विजयी झाले आहेत. गणेश घुले यांना ५ हजार ८५२ एवढी मते तर अनिरुद्ध भोसले यांना ५ हजार ८१६ मते मिळाली आहेत.

ग्रामपंचायतीच्या सर्वसाधारण मतदार संघातून ठाकरे गटाचे रामकृष्ण सातव यांनी ४०५, अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीचे सुदर्शन चौधरी यांनी २५६ मते मिळवून विजय मिळवला. याच मतदारसंघात अनुसूचित जाती जमाती गटातून राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनलचे नानासाहेब आबनावे यांनी ३०७ तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक गटातून शेतकरी विकास आघाडीचे रवींद्र कंद यांनी ३७५ मते घेवून विजय मिळवला.