पुणे : राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्ष पदावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा पुस्तक प्रकाशनाच्या जाहीर कार्यक्रमात केली.
यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी याला विरोध केला. तर महाविकास आघाडीतील महत्त्वाचा घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी पक्षाकडे पाहिले जाते. परंतु या पक्षाचे सर्वेसर्वा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केल्यामुळे महाविकास आघाडी देखील काहीशी अडचणीत सापडली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार याबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधान आले आहे.
अशातच विरोधी पक्ष नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल आदी नावांची चर्चा सध्या होत आहे.
परंतु केंद्रीय राजकारणामध्ये राष्ट्रवादी पक्षाचे वलय सातत्याने शरद पवार यांच्या माध्यमातून राहिले आहे. पक्षाचे वलय टिकवण्याची क्षमता असलेला राष्ट्रीय अध्यक्ष पक्षाच्या कोर कमिटीच्या माध्यमातून निवडला जाण्याची शक्यता असून गेले अनेक वर्ष केंद्रामध्ये खासदारकीचा अनुभव असलेल्या तसेच पक्षाचे राजकारण जवळून पहात असलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव पुढे येण्याची शक्यता प्रामुख्याने व्यक्त केली जात आहे.
महाविकास आघाडी निर्माण होत असताना पहाटेच्या शपथविधी वेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी दाखवलेला धिरोदत्तपणा अनेकांनी पाहिला आहे. तसेच प्रभावी मांडणी व पक्षाची एकनिष्ठा या पार्श्वभूमीवर देखील त्या प्रभावी ठरल्याचे दिसून आले आहे.
विविध राज्यातील भाजपा विरोधी पक्षांच्या नेतृत्वांशी खासदार सुप्रिया सुळे यांचे असलेले राजकारणातील प्रभावी संबंध या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांचे नाव प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या म्हणून पुढे येऊ शकते.
पक्षांतर्गत अनेक नेत्यांचे दबक्या आवाजातील सूर हे सुप्रिया सुळे यांना समर्थन करणारे असून तशी मागणी पक्षांतर्गत जोर धरू लागली आहे.
यामुळे पक्षाच्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून खासदार सुप्रिया सुळे यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी वर्णी लागण्याची दाट घेता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये निर्माण झाली आहे.