मनोज मांढरे यांना संत मुक्ताबाई संस्थानचा ” भागवत धर्म प्रसारक ” पुरस्कार जाहीर

मुक्ताईनगर : श्री संत मुक्ताबाई संस्थान , श्री क्षेत्र कोथळी – मुक्ताईनगर यांच्या वतीने दिला जाणारा ” भागवत धर्म प्रसारक “ पुरस्कार पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष मनोज मांढरे यांना जाहीर झाला आहे .
श्री क्षेत्र कोथळी – मुक्ताईनगर येथे या पुरस्काराची घोषणा श्री संत मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष ॲड रवींद्र भैय्यासाहेब पाटील यांनी मुक्ताईनगर येथे केली . संत मुक्ताबाई यांच्या अंतर्धान समाधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यावेळी सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे , संदीप पाटील , भागवत धर्म प्रसारक समितीचेअध्यक्ष सूर्यकांत भिसे , विनायक हरणे आणि विश्वस्त उपस्थित होते.
ॲड पाटील म्हणाले , श्री संत मुक्ताबाई संस्थानचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय भाऊसाहेब उर्फ प्रल्हादराव पाटील यांच्या स्मरणार्थ भागवत धर्माचा प्रचार व प्रसार करणाऱ्या वारकरी सांप्रदायातील एका पत्रकाराला २०१९ पासून ” भागवत धर्म प्रसारक ” पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येते . २०१९ चा पुरस्कार महाराष्ट्र राज्य पालखी सोहळा पत्रकार संघाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे यांना तर दुसरा पुरस्कार दैनिक सकाळ पुणेचे वरिष्ठ उपसंपादक शंकर टेमघरे यांना देण्यात आला होता .
हा पुरस्कार आषाढी एकादशीच्या दिवशी गुरुवार दि . २९ जुन २०२३ रोजी सकाळी ११ वाजता श्री संत मुक्ताबाई संस्थान मठ , श्री क्षेत्र पंढरपूर येथे मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे .

श्री. मांढरे हे सन १९९५ पासून मुक्त पत्रकारिता व छायाचित्रकार म्हणून काम पाहतात . त्यांनी संत ज्ञानेश्वर व संत सोपानदेव पालखी सोहळ्याचे वार्तांकन व छायाचित्रण केले आहे . भागवत धर्माच्या प्रचार व प्रसारासाठी त्यांनी श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमान ( पंजाब ) अशी एक महिन्याची सायकल यात्रा काढली होती . त्यांच्या या कार्याची दखल घेवून संस्थानने या पुरस्कारासाठी श्री मांढरे यांची निवड केली आहे .

See also  जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केली चांदणी चौक येथील परिसरातील रस्त्याच्या कामांची पाहणी