बार्टीच्या आश्वासनानंतर संशोधक विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे

पुणे : – डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे कार्यालयासमोर आमरण उपोषणाकरिता बसलेल्या पीएच.डी च्या १७० संशोधक विद्यार्थ्यांचा प्रलंबित असलेला निर्णय मार्गी लावण्याचे आश्वासन महासंचालक सुनील वारे यांनी संशोधन विद्यार्थ्यांची भेट घेऊन दिल्याने मागील ५ दिवसापासून सुरू असलेले आमरण उपोषण संशोधक विद्यार्थ्यांनी मागे घेतले आहे.

एम.फिल ते पीएच.डी. करीता युजीसी व एनएफएससीच्या मार्गदर्शक तत्वानुसार पाच वर्ष कालावधीपर्यंत अधिछात्रवृत्ती देण्याची मागणी संशोधक विद्यार्थ्यांनी बार्टी संस्थेकडे केली . त्या अनुषंगाने २२ मे पासून विद्यार्थी उपोषणास बसले होते. उपोषणकर्त्यांच्या मागणीच्या अनुषंगाने बार्टी संस्थेचे महासंचालक सुनील वारे यांनी शुक्रवारी उपोषणकर्ते शरद डुमणे, अरविंद भुक्तर व विकी जंगले तसेच इतर संशोधन विद्यार्थी यांनी केलेल्या मागणीनुसार सकारात्मक निर्णय घेतला. संशोधन विद्यार्थ्यांना न्याय देऊ असे आश्वासन त्यांनी दिल्याने विद्यार्थ्यांनी आमरण उपोषण मागे घेतले.

बार्टी संस्थेच्या निबंधक इंदिरा अस्वार, योजना विभागाच्या विभागप्रमुख स्नेहल भोसले , रविंद्र कदम, डॉ. सत्येंद्रनाथ चव्हाण, प्रकल्प व्यवस्थापक डॉ.सारीका थोरात, सहायक प्रकल्प व्यवस्थापक, डॉ.अंकुश गायकवाड, प्रकल्प अधिकारी समाधान दुधाळ, फेलोशिप विभागातील अधिकारी व संशोधन विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

See also  जागतिक योग दिनानिमित्त पाषाण मध्ये योग शिबिराचे आयोजन