गुणवान खेळाडूंना सरावासाठी सर्व सहकार्य-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे : जिल्ह्यातील होतकरू आणि गुणवान खेळाडूंनी ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होण्याचे स्वप्न बाळगून नियमित सराव करावा; त्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.

कै. बाबुराव सणस मैदानावर तयार करण्यात आलेल्या ४०० मीटर ८ लेन सिंथेटिक ट्रॅकच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार भीमराव तापकीर, मनपा आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, विकास ढाकणे, उपायुक्त राजीव नंदकर, हेमंत रासने, अजय खेडेकर, स्मिता वस्ते, अभय छाजेड आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, खेळाडूंनी राज्य किंवा राष्ट्रीय स्तरापर्यंत न थांबता आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरण्याची जिद्द बाळगावी. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी खेळाडूंना राज्य शासनातर्फे प्रोत्साहन देण्यात येत आहे. यशस्वी खेळाडूंना शासनसेवेत अधिकारी म्हणून घेण्यात आले आहे. खेळाडूंनी त्यांच्यासाठी तयार करण्यात आलेल्या सुविधांचा लाभ घ्यावा. प्रशिक्षकांनी त्यांच्याकडून उत्तम सराव करून घ्यावा. खेळाडूंना सरावासाठी काहीही कमतरता भासू दिली जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात श्री.ढाकणे यांनी सिंथेटिक ट्रॅकविषयी माहिती दिली. पुण्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचा हा पाचवा सिंथेटिक ट्रॅक आहे. या ट्रॅकमुळे शहरातील मध्यवर्ती भागातील खेळाडूंना सरावाची चांगली सुविधा होईल, असे त्यांनी सांगितले.

श्री.खेडेकर यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते क्रीडा प्रशिक्षकांचा सत्कार करण्यात आला. तसेच उद्घाटन प्रसंगी घेण्यात आलेल्या १०० मीटर धावण्याच्या प्रात्यक्षिक स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यांनी खेळाडूंशी संवाद साधून त्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाला नागरिक, क्रीडा प्रशिक्षक, खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

See also  महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’ ला विद्यार्थी आणि उद्योजकांनी भेट द्यावी -उद्योगमंत्री उदय सामंत