महिला आयोगाची ‘आरोग्य वारी’ १० जुन पासून

मुंबई : –आषाढी एकादशीला विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपुरकडे पायी निघणार्या लाखो महिला वारकर्यांच्या स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्य महिला आयोगाकडून आयोजित ‘आरोग्य वारी’ साठी पुणे, सातारा आणि सोलापुर प्रशासन सज्ज झाले असून तीनही जिल्ह्यात आवश्यक त्या सोयी सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी स्वत: या यंत्रणांच्या तयारीचा आढावा घेतला आहे.

‘आरोग्य वारी’चा शुभारंभ पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार रवींद्र धंगेकर, आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत शनिवार, दि १० जून रोजी निवडूंगा विठ्ठल मंदिर, भवानी पेठ, पुणे येथे सकाळी १० वाजता होणार आहे.

१० जून पासून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली आणि जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून अनेक संतांच्या पालख्या पंढरपुराची वाट चालू लागणार आहेत. २९ जून ला आषाढी एकादशी पर्यंत लाखो वारकरी पायी चालत पंढरपुरात दाखल होणार आहेत. यात महिलांची संख्या ही लक्षणीय असते. या महिलांच्या स्वच्छ आणि सुरक्षित वारी अनुभवासाठी राज्य महिला आयोगाकडून आरोग्य वारी उपक्रम राबविण्यात येत आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पुणे, सातारा, सोलापुर जिल्हा प्रशासनसोबत दुरदृश्य प्रणाली द्वारे बैठक घेत आवश्यक त्या सोयी सुविधा पुरविणण्याचे निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने तीन ही जिल्ह्यात व्यवस्था करण्यात येत आहेत.

पुणे जिल्ह्यात महिलांच्या वैयक्तिक स्वच्छतेच्या, सुरक्षिततेच्या अनुषंगाने नियोजन करण्यात आले असून १६ प्राथमिक आरोग्य केंद्र व ८ उपकेंद्रात हिरकणी कक्षाची स्थापना करण्यात येत आहे. उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेत पिण्याचे पाणी, शौचालय या सह तात्पुरते निवारा व्यवस्था करण्यात येत आहे. प्राथमिक उपचार सुविधा देणारे अधिकारी कर्मचारी तैनात करण्यात येत आहेत. महिला वारकर्यांसाठी स्वतंत्र बेडची व्यवस्थाही निवारा केंद्रात करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील पालखी मार्गावर महिला भाविकांसाठी ४८८ आरोग्य कर्मचार्यांची नेमणूक करण्यात आली आहे. ८७ अँम्ब्युलन्स पथक नेमण्यात आले असून प्रत्येक पथकात १ महिला स्वतंत्र कर्मचारी नेमण्यात आली आहे. मुक्कामी ठिकाणी २४ पथके किमान १ महिला कर्मचारीसह नियुक्त केली आहेत. पालखी मार्ग, मुक्काम, विसावा येथे कार्डिओ आणि अँम्ब्युलन्ससाठी आवश्यक औषध पुरवठा करुन ठेवण्यात आला आहे. गावातील महिला बचत गट, आरोग्य कर्मचारी यांच्या मार्फत औषध उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी स्थानिकांचा सहभाग, सहकार्य घेतले जाणार आहे. सँनिटरी नँपकीन, त्याचे विघटन याचेही नियोजन करण्यात आले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची सुविधा, कर्मचारी वर्ग नियुक्ती करण्यात येत आहे. संपुर्ण पालखी मार्गावर महिलांसाठी १४०० शौचालयांची व्यवस्था करण्यात आली असून पाणी, लाईट, महिला समन्वयक यांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी दिशा दर्शक फलक लावण्यात आले आहेत. मार्गावारील खाजगी शौचालयही महिलांना उपलब्ध व्हावे यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करत त्यावर पांढरे झेंडे लावण्यात येणार आहेत. स्नानगृहाची व्यवस्था, कपडे बदलासाठी आडोसा स्थानिर ग्रामपंचायतीच्या सहकार्याने करण्यात येत आहे. संपुर्ण मार्गावर, राहायच्या ठिकाणी स्वच्छ प्रकाश असेल यासाठी ५ दिवस आधीपासूनच लाईटची व्यवस्था करण्यात येत आहे.

See also  पुणे जिल्ह्यातील युरिया व डीएपी खताचा संरक्षित साठा मुक्त

पुणे व्यतिरिक्त सातारा जिल्ह्यात अंगणवाड्यांमधे महिला वारकर्यांसाठी न्हाणीघर, स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली असून दुचाकी वर तैनात आरोग्य पथकाची सोय करण्यात आली आहे. पिवळ्या रंगाच्या या दुचाकी लगेच ओळखता येतील अशा पद्धतीने तयार करण्यात आल्या आहेत. महिला निवारा कक्षात महिला नोडल अधिकारी, २१ ठिकाणी हिरकणी कक्ष सातारा जिल्हा प्रशासनाने तयार केले आहेत. तर सोलापुर जिल्ह्यात दर दिड किमी वरच्या निवारा कक्षात निर्भया पथक गस्त घालणार आहे, ४० ठिकाणी हिरकणी कक्ष, २५ डाँक्टर पथक अशा सुविधांचे नियोजन करण्यात आले आहे.

तीन ही जिल्ह्यातील प्रशासन आणि पोलिसांनी उत्तम तयारी केली असून आवश्यक गोष्टींची अंमलबजावणी झाली आहे. पंढरीच्या ओढीने निघालेल्या लाखो महिला वारकर्यांना सुरक्षित, स्वच्छ वारीचा आनंददायी अनुभव मिळावा यासाठी आयोग प्रयत्नशील असल्याचे आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितले.