गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉलकरिता अर्ज करण्याचे आवाहन

पुणे : जिल्ह्यातील अनुसूचित जाती घटकातील चर्मकार समाजातील गटई काम करणाऱ्यांनी सामाजिक न्याय विभागाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल योजनेच्या लाभासाठी अर्ज करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त कैलास आढे यांनी केले आहे.

अनुसूचित जाती घटकातील चर्मकार समाजासाठी गटई काम (चामड्याच्या वस्तू दुरुस्ती व पादत्राणे दुरुस्ती) करणाऱ्या नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येतो. या योजनेंतर्गत रस्त्याच्या कडेला ऊन व पावसापासून संरक्षण होण्यासाठी शंभर टक्के अनुदान तत्वावर ४ फूट गुणिले ५ फूट गुणिले ६.५ फूट लांबी, रुंदी व उंची या आकाराचा पत्र्याचा स्टॉल देण्यात येतो.

योजनेच्या लाभासाठी लाभार्थी हा अनुसूचित जाती घटकातील चर्मकार समाजातील असावा. लाभार्थ्यांची वयोमर्यादा ही १८ ते ६० इतकी असावी. अनुसूचित जातीचा दाखला, नागरी भागासाठी ५० हजारपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या तर ग्रामीण भागासाठी ४० हजार पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या धारकांना स्टॉल ठेवण्यासाठी स्वतःची जागा किंवा नगर परिषद, महानगरपालिका जागेमध्ये ठेवण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र, स्टॉल विकणार नसल्याबाबतचे हमीपत्र व उत्पनाचा दाखला आदी कागदपत्रांची आवश्यकता आहे.

संबंधित लाभार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण पुणे, सामाजिक न्याय भवन, सर्वे नं. १०४/१०५, विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्यासमोर, येरवडा, पुणे ४११००६ दुरध्वनी-०२०-२९७०६६१ या कार्यालयात ३१ ऑगस्ट पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.

See also  सुसगाव येथे २४×७ समान पाणीपुरवठा योजनेच्या कामाला सुरुवात माजी शहर सुधारणा समिती अध्यक्ष अमोल बालवडकर यांची पाहणी