महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण ताकदीने या सगळ्या घटनेत आदरणीय शरद पवारसाहेब यांच्याबरोबर राहणार – प्रदेशाध्यक्ष मा. जयंतराव पाटील

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने विरोधी पक्षनेते म्हणून अजित पवार काम करत होते. आज सकाळी त्यांनी नेहमीप्रमाणे विधानसभा सदस्यांची बैठक घेतली आणि त्यानंतर त्यांनी राजभवनावर जाऊन शपथ घेतल्याचे निदर्शनास आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांच्याकडून देखील पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने या सगळ्या घटनेत शरद पवार यांच्याबरोबर राहणार असल्याची स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत मांडली.

विधानसभेच्या काही सदस्यांनी मंत्रिमंडळात जाण्याचा निर्णय घेतला असे दिसत आहे आणि मंत्रिमंडळात पक्षाच्या मान्यतेशिवाय त्यांनी सत्तारूढ पक्षाकडे जाऊन शपथविधीचा हा कार्यक्रम केला आहे. राष्ट्रवादी पक्ष म्हणून महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्त्यांच्यावतीने आणि विधानसभेच्या विधीमंडळ पक्षाचा गटनेता या नात्याने ठामपणे सांगतो की विधीमंडळ पक्ष आणि महाराष्ट्रातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने झालेल्या घटनेने व्यतीत होऊन आपल्या प्रतिक्रिया महाराष्ट्रात देत आहेत. झालेल्या घटनेचा निषेध करत आहेत. महाराष्ट्रातील कार्यकर्ते एकसंघपणाने शरद पवारसाहेबांच्या बरोबर आहेत ही भूमिका महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात व्यक्त करत आहेत. मला खात्री आहे आज जो शपथविधी झाला त्याला ज्या सदस्यांना बोलावून घेण्यात आले त्यांच्या कशावर सह्या घेतल्या. अजून आम्हाला कळले नाही. पण त्यातले बरेच सदस्य जे टिव्हीवर त्या कार्यक्रमात दिसत होते त्या सर्वांनी शरद पवारसाहेबांशी बोलून आम्ही गोंधळलो होतो ही भूमिका मांडली आहे. काहींनी माझ्याशी संपर्क साधला. त्या सर्व आमदारांचे कन्फ्युजन आहे. पवार साहेबांच्या पत्रकार परिषदेमुळे हे आता स्पष्ट झाले आहे की आज घेण्यात आलेल्या कृतीला शरद पवार साहेबांचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, फ्रंटलचे पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आणि महाराष्ट्राची कार्यकारिणी यांची ५ जुलैला दुपारी एक वाजता बैठक आदरणीय शरद पवारसाहेब यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे बोलावली आहे. आदरणीय शरद पवारसाहेब आपली स्पष्ट भूमिका स्पष्ट मांडतीलच असेही जयंतराव पाटील यांनी सांगितले.

See also  शरद पवार यांना धमकी प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेतली

सत्तेत असणार्‍यांकडे संख्याबळ असताना पुन्हा आणखी एक विरोधी पक्ष फोडण्याचे काम काही लोकांनी महाराष्ट्रात केले आहे. शिवसेना पक्ष फोडण्याचे काम झाले. तो लढा सुप्रीम कोर्टात गेला. तो निवाडा दिला आहे तो सर्वश्रुत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अशी घटना पुन्हा घडेल असे वाटत नव्हते पण दुर्दैवाने सत्तेत बसलेल्या लोकांनी अशी पाऊले टाकली आहेत. आज जी घटना झाली त्यातून महाराष्ट्रातील दुसराही राजकीय पक्ष फोडण्याचे काम झाले. देशात नऊ राज्य आहेत ज्यामध्ये विरोधी पक्षाला किंवा सत्तेत असणार्‍या पक्षांना पक्ष फोडून त्यांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. मला खात्री आहे की आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वावर महाराष्ट्राने वेळोवेळी विश्वास दाखवला आहे. महाराष्ट्रातील सगळा युवक, ज्यांना महाराष्ट्राचे भले व्हावे, प्रगती यावी आणि महाराष्ट्रात असं फोडाफोडीचे राजकारण थांबावं आणि निवडून आलेल्यांना थांबवण्यासाठी पडेल त्या पद्धतीने फोडाफोडी चालू आहे हे सगळे राजकारण थांबले पाहिजे या भूमिकेला या विचारसरणीला ज्यांचा पाठिंबा आहे ते सर्व सक्षमपणाने महाराष्ट्रभर पवार साहेबांच्या मागे उभे राहतील असा विश्वास व्यक्त करतानाच आम्ही कारवाई संदर्भात अजून यावर अभ्यास केलेला नाही. त्याबाबत योग्य ती आणि आवश्यक ती पावलं यथावकाश आम्ही टाकू असेही जयंतराव पाटील यांनी स्पष्ट केले.

ज्या नऊ सदस्यांनी शपथ घेतली पक्षाच्या धोरणाच्या विरोधात जाऊन त्यांनीच पलीकडे पाऊल टाकले आहे. उरलेल्या सर्व आमदारांना मी दोष देणार नाही. त्यांनी कशावर सह्या केल्या असतील तर त्यातील आमदारांनी आमच्याशी संपर्क साधला आहे. त्यामुळे त्या सर्वांची भूमिका काय आहे हे नक्की स्पष्टपणे आमच्या समोर आल्यावर त्यावर आम्हाला विचार करावा लागेल अशी भूमिकाही जयंतराव पाटील यांनी मांडली.

लोटस हा सिम्बॉल हा भाजपचा आहे. भाजपने महाराष्ट्रात अगोदर एक घटना केली होती आता ही दुसरी घटना केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या मनात भाजपबद्दल वेगळ्या भावना जेव्हा शिवसेना फोडल्यावर झाल्या होत्या तशा पुन्हा एकदा तयार झाल्या आहेत असेही जयंतराव पाटील यांनी सांगितले.

See also  राज्य निवडणूक आयोगाकडूननिवडणूक कार्यक्रमाची घोषणा नाही

अजितदादा पवार काय म्हणाले यासाठी ही पत्रकार परिषद घेतली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या पाठीशी भक्कमपणे उभा कसा आहे हे सांगण्यासाठी ही पत्रकार परिषद आहे हेही जयंतराव पाटील यांनी स्पष्ट केले.

विधिमंडळ मुख्य प्रतोद म्हणून जितेंद्र आव्हाड यांची नेमणूक केली आहे. तसे पत्र विधान भवनात पाठवण्यात आले आहे असेही जयंतराव पाटील यांनी सांगितले.

शिंदे व फडणवीस सरकारला आमच्या पक्षाचा कोणताही पाठिंबा नाही. आमच्या पक्षाच्या आदेशाचे किंवा पक्षाच्या धोरणाचे उल्लंघन केले आणि ज्यांनी शपथ घेतली व मंत्री झाले त्यांनाही आमच्या पक्षाचा पाठिंबा नाही. पक्षाचे धोरण या सरकारला पाठिंबा देण्याचे नसताना काही लोकांनी शपथ घेतली. शेवटी ते आमचे सगळे सहकारी आहेत पण कायदेशीर अडचणी आल्या तर त्याला त्यांना तोंड द्यावे लागेल असेही जयंतराव पाटील यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, अनेक नेते ताकदीने शरद पवार साहेब यांच्या पाठीशी आहेत. आम्हाला विश्वास आहे जेव्हा – जेव्हा अशी संकटे येतात तेव्हा – तेव्हा शरद पवार साहेब प्रचंड मोठ्या ताकदीने बाहेर पडतात. शरद पवार साहेब हे उद्या कराड येथे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घ्यायला जात आहेत. ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी ज्यांनी महाराष्ट्राच्या स्थापनेचा अमृतकलश आणला त्यांच्या समाधीचे दर्शन करताना या महाराष्ट्राचे राजकारण हे बेरजेचे असले पाहिजे, महाराष्ट्रात शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार टिकले पाहिजेत. महाराष्ट्रात सर्वसामान्य गोरगरीब पददलितांना न्याय देण्याचे काम झाले पाहिजे, राज्यात अल्पसंख्याक सुरक्षित राहिला पाहिजे आणि महाराष्ट्राचे चौफेर विकास केला पाहिजे ही भूमिका ज्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी राज्याला सांगितली ते आजच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी पवारसाहेब जात आहेत आणि महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकरांचे राजकारण अधिक ताकदीने पुरोगामी चळवळीचे राजकारण महाराष्ट्रात टिकवण्याचे काम शरद पवार करत आहेत ते उद्या जात आहेत त्याला विशेष महत्व आहे असेही जयंतराव पाटील म्हणाले.

See also  नरेंद्र मोदी हे फक्त अदाणीचे पंतप्रधान आहेत,आम आदमी पार्टीच्या महासंकल्प जनसभेत खासदार संजय सिंह यांचा पुण्यात घणाघात

आज अजित पवार यांच्या निवेदनातून आमच्या लक्षात आले की त्यांनी राजीनामा दिला आहे तो पक्षाला कळवायला हवा होता ते योग्य झाले असते पण त्यांनी तो तिकडे पाठवला असणार तर विरोधी पक्षनेते पदाची जी जागा रिक्त झाली आहे. आमची सगळयात जास्त संख्या आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांना शरद पवार यांच्या मान्यतेने विरोधी पक्षनेता म्हणून मान्यता दिली आहे अशी घोषणाही जयंतराव पाटील यांनी यावेळी केली.

आता निवडणूकीला सव्वा वर्ष राहिले आहे त्यानंतर निवडणूका लागणार आहेत. पाच राहिले तरी शरद पवार ती संख्या वाढवून दाखवली हे त्यांनीच सांगितले आहे. आता चित्र वेगळे आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची ताकद काय आहे हे लक्षात येईल असेही जयंतराव पाटील यांनी स्पष्ट केले.