चिंतामणी ज्ञानपीठाच्या वतीने गुरूजन गौरव पुरस्कार प्रदान

पुणे. : चिंतामणी ज्ञानपीठाच्या वतीने गुरूजन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.आपापल्या क्षेत्रात कर्तृत्वाचे उत्तुंग शिखर गाठलेल्या गुरुवर्यांचा “गुरुजन गौरव” पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
चिंतामणी ज्ञानपीठाच्या वतीने आयोजित केलेल्या गुरूजन गौरव पुरस्कार सोहळ्यामध्ये ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, ज्येष्ठ काँग्रेस नेते उल्हास पवार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अरुण अडसूळ आणि आॅल इंडिया जैन कॉन्फरन्सचे अध्यक्ष रमणलाल लुंकड यांना आज गुरूजन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या प्रसंगी व्यासपीठावर चिंतामणी ज्ञानपीठाचे अध्यक्ष अप्पा रेणुसे, दत्ता धनकवडे, विजूशेठ जगताप, विकास दांगट, विशाल तांबे, प्रकाश शेठ कदम, युवराज बेलदरे, बाळासाहेब धनकवडे, अश्विनी भागवत , सुधीर कोंढरे ,अभय मांढरे , बाळासाहेब खेडेकर, काकासाहेब चव्हाण, बाबा धुमाळ, दिलीपराव थोपटे, युवराज रेणुसे, अनिल सोंडकर आदी मान्यवर उपस्थित होते.


जीवन घडवणारे गुरू आयुष्यात लाभले हे माझे भाग्यच आहे. त्यांच्यामुळेच आज माझा गुरू म्हणून सत्कार होतो आहे, अशी प्रांजळ भावना ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, गुरू म्हणून माझा हा पहिलाच सत्कार आहे. त्यानिमित्ताने मला गुरू म्हणून भेटलेल्या प्रत्येकाची आज मला आठवण येते. दीपस्तंभासारखी माणसं गुरू म्हणून मला लाभली. लोकशाहीचा खरा अर्थ शिकवणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे खरे गुरू आहेत असे मी मानतो. त्यांनी आपल्याला संविधानाच्या रूपाने विचारस्वातंत्र्य दिले. प्रत्येक गुरूपोर्णिमेला आपण संविधानाचे स्मरण करायला हवे.


उल्हास पवार म्हणाले, आपण कायमच शिष्याच्या भूमिकेतून शिकत राहायला हवे आणि स्वत:ला शिष्य मानायला हवे, त्यातूनच आपण आपोआप गुरूस्थानी पोहोचतो. आज मी सर्व क्षेत्रांत वावरलो आणि त्याचा मनापासून आनंद घेतला. अनेकांनी मला घडवले. आजच्या युगात मोबाईलने मात्र आपल्याला यंत्रवत करून सोडले आहे. त्यामुळे माहिती, ज्ञान याच्या पलीकडे जाऊन शहाणपण देणारे अनौपचारिक शिक्षण देणे ही काळाची गरज आहे.
डॉ. अडसूळ म्हणाले, आज आम्हाला मिळालेला पुरस्कार ही आत्म्याला प्राणवायू देणारी गोष्ट आहे. त्यातून नव्याने काम करण्याची प्रेरणादेखील मिळाली आहे. आपल्या आजुबाजूला जे घडते आहे त्याचा एक नकारात्मक परिणाम मुलांवर होतो आहे. त्यामुळे नवीन शैक्षणिक धोरण लागू होत असताना शिक्षकांनादेखील या पुढील काळात आपली भूमिका बदलावी लागेल आणि गुरूच्या भूमिकेत जावे लागेल.
लुंकड म्हणाले, पुरस्कारासाठी गुरू म्हणून विचार केला गेला ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्यानिमित्ताने माझ्या कार्याचा सन्मान झाला आहे असे मी मानतो.
या प्रसंगी माझ्यासह चिंतामणी ज्ञानपीठ व अप्पा रेणुसे मित्र परिवारातील सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

See also  मॉडर्न महाविद्यालय गणेशखिंड 'अविष्कार' संशोधन स्पर्धेचे बक्षीस वितरण