‘AI’ yo Tools हे पुस्तक केवळ वाचायचे नसून ते ‘वापरायचे’ आहे – ज्येष्ठ लेखक डॉ. अच्युत गोडबोले

पुणे : आधुनिक विज्ञान -तंत्रज्ञानाचा विकास मानवी कुतूहलातून झाला आहे. नजिकच्या भविष्यात तंत्रज्ञानाच्या वाटा कल्पनातीत गतीने भरारी घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर, ‘Al’ yo Tools या पुस्तकाचे महत्त्व विशेष आहे. हे पुस्तक केवळ वाचायचे नसून ते ‘वापरायचे’ आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक डॉ. अच्युत गोडबोले यांनी केले.
जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता दिन १६ जुलै रोजी जगभर साजरा केला जातो. या दिवसाचे  औचित्य साधून न्यूफ्लेक्स टॅलेंट सोल्यूशन्सच्या वतीने ‘AI’yo Tools या डॉ. अमेय पांगारकर लिखित पुस्तकाचे प्रकाशन प्रख्यात लेखक अच्युत गोडबोले यांच्या हस्ते झाले.


पुस्तकाचा आशय अधोरेखित करत मेटाव्हर्स, आॅगमेंटेड रिअॅलिटी, एन एफ टी आणि ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून चार प्रकारे या पुस्तकाचे प्रकाशन संपन्न झाले. ‘AI’yo Tools या पुस्तकात  कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित १०१ साधनांचे संकलन लेखक डॉ. अमेय पांगारकर यांनी केले आहे. ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे.
गोडबोले म्हणाले,’समाजातील सर्व घटकांना हे पुस्तक उपयुक्त ठरेल. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असाल तरी कामाची गुणवत्ता, दर्जा, वैशिष्ट्ये, नियोजन, व्यवस्थापन, विपणन… प्रत्येक टप्प्यावर नव्या युगात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जात आहे. हे पुस्तक वाचकाला यासंदर्भात केवळ माहिती देते असे नाही तर व्यवहार्य उपाय सुचवते. विद्यार्थी, शिक्षक, पालक, व्यावसायिक सगळ्यांना ते उपयुक्त ठरेल,’.
न्यूफ्ल्लेक्स टॅलेंट सोल्यूशन्सचे प्रमुख डॉ. भूषण केळकर यांनी याप्रसंगी “कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपण” या विषयावर पारदर्शिकांच्या साह्याने मार्गदर्शन केले.


डॉ. अमेय पांगारकर यांनी पुस्तकाचा प्रवास आणि या साधनांची नजीकच्या भविष्यातील गरज याविषयी मनोगत मांडले. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित काही साधनांचा यशस्वी वापर केलेल्या युवकांचा सत्कार करण्यात आला. डॉ. भटकर यांनी दृकश्राव्य माध्यमातून मनोगत व्यक्त केले.
क्यूआर कोड्स चा वापर करत ही साधने कशी वापरावी, या साधनांद्वारे काय – काय करता येईल, त्यांची साधारण किंमत काय आहे, अशा साऱ्या प्रश्नांची उत्तरे या पुस्तकातून मिळणार आहेत.
माधवी नाडकर्णी यांनी आभार मानले. मधुरा केळकर यांनी सूत्रसंचालन केले.

See also  मॉडर्न महाविद्यालय गणेशखिंड येथे 'मॉडर्न ट्रेकिंग क्लब' ची स्थापना