पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते कोथरुडच्या जिगरबाज पोलिसांचा सत्कार

कोथरूड : काही दिवसांपूर्वी कोथरूड पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेमुळे दोन दहशतवाद्यांना पकडण्यात यश आले. आज पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कोथरुड पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वातील सर्व टीमचा विशेष सत्कार करुन अभिनंदन केले. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यदक्षतेचा सर्वांना अभिमान असल्याचे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.

राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून फरार म्हणून घोषित केलेल्या दोन दहशतवाद्यांना कोथरुड पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे पकडण्यात यश आले. या कारवाईत पोलिस अंमलदार प्रदीप चव्हाण व अमोल नजन यांच्या सह पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कुलकर्णी, पोलीस अंमलदार बाला रफी शेख, अनिकेत जमदाडे, ज्ञानेश्वर पांचाळ, वैभव शिरकाल यांनी अतिशय शिताफीने दोघांना पकडले.

कोथरुड पोलिसांच्या या कारवाईचे संपूर्ण देशभरातून कौतुक होत असून, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज आपल्या कोथरुडमधील निवासस्थानी सर्व पोलिसांचा यथोचित सन्मान करुन, त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

यावेळी भाजपा नेते शैलेश टिळक, प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, भाजपा कोथरुड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी हे देखील उपस्थित होते.

See also  कोथरूड मध्ये पेट्रोल २४ रुपयांनी स्वस्त, वर्धापन दिनानिमित्त कोथरूड युवक राष्ट्रवादी तर्फे यशस्वी मोहीम