सैनिक कल्याण विभागातर्फे २४ वा ‘कारगिल विजय दिवस’ साजरा

पुणे : सैनिक कल्याण विभाग, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय पुणे, महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ लिमिटेड (मेस्को), एस.के.एफ. लिमिटेड व बोनिसा वर्ल्ड फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने २४ व्या ‘कारगिल विजय दिवस’ निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

सैनिक कल्याण विभागाच्या महासैनिक लॉनमध्ये आयोजित या समारंभास सैनिक कल्याण विभाग विभागाचे माजी संचालक कर्नल(निवृत्त) भगतसिंह देशमुख, उपसंचालक ले. कर्नल (निवृत्त) राजेंद्रकुमार रा. जाधव, जिल्हा सैनिक अधिकारी ले. कर्नल (निवृत्त) सतेश दे. हांगे, कर्नल (निवृत्त) लक्ष्मण साठे, एस. के. एफ. मित्र परिवाराचे राजेंद्र जगदाळे, बोनिसा वर्ल्ड फाउंडेशनचे संकेत बियानी, वीरपत्नी, वीरपिता, अपंग जवान व माजी सैनिक उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात अमर जवान स्मृतिचिन्हास पुष्पचक्र अर्पण करुन शहीद सैनिकांच्या आठवणीत दोन मिनिटांची स्तब्धता पाळून करण्यात आली. यावेळी सर्व शहीद जवानांना अभिवादन करुन श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच शहीद सैनिकांच्या १२ वीरपत्नी, १ वीरपिता व २ अपंग जवान यांचा ‘एस.के.एफ. लिमिटेड’ यांचेकडून भेटवस्तू व ‘बोनिसा वर्ल्ड’ या संस्थेकडून ‘वन इंडिया रिंग’ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच सैनिक कल्याण विभाग आणि जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीनेही त्यांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमात मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले तर प्रास्ताविक ले. कर्नल सतेश हांगे (निवृत्त) यांनी केले.

कारगिल विजय दिवस
सन १९९९ मध्ये एप्रिल ते जुलै या कालावधीत भारतीय सैन्याने पाकिस्तान सेनेविरुद्ध कारगिल क्षेत्रात विजय मिळविला होता. या संग्रामात भारतीय सैनिकांचा दृढनिश्चय आणि पराक्रम दिसून आला. २६ जुलै १९९९ रोजी भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैनिकांनी कब्जा केलेले शेवटचे ठाणे जिंकून भारतीय सीमा मुक्त केली. हा दिवस संपूर्ण देशभरात ‘कारगिल विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो.

राज्यातही कारगिल स्मृतिदिन समारंभ सन २००० पासून प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने साजरा करण्यात येतो. कारगिल युद्धात शहीद झालेले अधिकारी व जवानांच्या स्मृतीस अभिवादन व त्यांच्या बलिदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासह कारगील युद्धातील शहीद जवानांच्या वीरपत्नी, वीरमाता व वीर पित्यांचा गौरव या निमित्ताने करण्यात येतो.

See also  शॉटगन क्रीडा प्रकारात महाराष्ट्राला पहिल्यांदा सुवर्णपदक