नागपूर विद्यापीठातील बनावट पदवीप्रकरणी सखोल चौकशी करणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील

मुंबई : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बनावट पदव्या तयार करून 27 विद्यार्थ्यांनी इराकमध्ये नोकरी मिळवल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत सांगितले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठाच्या बनावट पदव्या तयार करून 27 विद्यार्थ्यांनी इराकमध्ये नोकरी मिळवल्याबाबतचा प्रश्न सदस्य मोहन मते उपस्थित केला होता.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील म्हणाले की, इराक दूतावासामार्फत 27 विद्यार्थ्यांची शैक्षणिक पात्रता तपासण्याकरिता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाला पत्र प्राप्त झाले होते. त्यानुसार इराक दूतावासातील अधिकाऱ्यांनी विद्यापीठाला प्रत्यक्ष भेट देऊन 27 विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रमाणपत्र तपासण्याकरीता सादर केले होते. विद्यापीठात या विद्यार्थ्यांची नोंद नसल्याचे अभिलेख्याच्या तपासणीवरून आढळून आल्याने विद्यापीठात सादर करण्यात आलेली प्रमाणपत्रे विद्यापीठाची नाहीत, असे इराक दूतावासाला पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.

हे विद्यार्थी इराकचे असल्याने त्यांची चौकशी इराक दूतावासामार्फत करण्यात येईल, असे इराक दूतावासातील अधिकाऱ्यांनी विद्यापीठास कळविले आहे.

तसेच या प्रकरणाची माहिती विद्यापीठाकडून अंबाझरी पोलीस ठाणे, नागपूर, सचिव शिक्षा मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली, सचिव, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली आणि अध्यक्ष, विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांना देण्यात आली आहे, असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

या चर्चेत सदस्य अनिल देशमुख, नितीन राऊत, विकास ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, रवींद्र वायकर, ॲड.आशिष शेलार यांनी सहभाग घेतला.

See also  महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचे पुरस्कार प्रदान; साहित्यिक, लेखक पुरस्काराने सन्मानित