विधिमंडळाच्या परिसरात स्व.गणपतराव देशमुख यांचे स्मारक लवकरच उभारणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सोलापूर :- स्व. गणपतराव देशमुख तथा आबासाहेब हे विधी मंडळाचे चालते बोलते विद्यापीठ होते. त्यामुळे विधिमंडळाच्या परिसरात त्यांचे स्मारक उभारण्याबाबत सर्व पक्षाचे एकमत आहे. विधिमंडळाच्या दोन्ही अध्यक्ष व ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनानुसार लवकरच स्व. गणपतराव  देशमुख यांचे लोकांना दिसेल असे स्मारक उभारणार, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

             सांगोला येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर आयोजित स्व. गणपतराव देशमुख यांचे स्मारक व महाविद्यालय नामांतर सोहळा कार्यक्रम प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार होते.

             यावेळी विधान परिषदेचे माजी सभापती आमदार  रामराजे नाईक निंबाळकर, माजी उपमुख्यमंत्री विजय सिंह मोहिते पाटील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, खासदार संजय काका पाटील,जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, सर्वश्री आमदार जयंत पाटील, बबनराव शिंदे, संजय शिंदे सचिन कल्याणशेट्टी, शहाजी पाटील, समाधान आवताडे, रणजितसिंह मोहिते पाटील, राम सातपुते, राजेंद्र राऊत, यशवंत माने, राम शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

        उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले की, स्वर्गीय गणपतराव देशमुख यांनी शेतकरी, कष्टकरी , कामगार यांचे प्रश्न अत्यंत धडाडीने मांडले. सामान्यांच्या उत्थानासाठी सातत्याने ते जीवनभर झटत होते. परिवर्तन हा संसाराचा नियम आहे, मात्र राजकारणातील शाश्वत सत्य हे गणपतराव देशमुख होते, त्यांनी परिवर्तनाचे सर्व नियम बाजूला ठेवून एकाच विचाराने काम केले, चे गौरवोद्गार त्यांनी काढले.

              विरोधी पक्षात असताना आम्ही एकलव्य म्हणून गणपतराव देशमुख यांच्याकडून खूप शिकलो. मंत्री पद गेल्यावर शासकीय वाहन सोडून एसटीने जाणारे नेते, सभागृह सुरू व्हायच्या अगोदर प्रथम येणारे आणि सभागृह संपल्यावर शेवटी जाणारे, एकही दिवस सुट्टी न घेणारे आमदार, वन मॅन आर्मी म्हणजे गणपतराव अशी आठवण श्री. फडणवीस यांनी सांगून विदर्भाचे सिंचन आणि राज्यातील दुष्काळी भागाचे दुःख एकच असल्याचे गणपतराव सांगायचे व त्यांच्यामुळेच महाराष्ट्रातील दुष्काळी भागाचे आणि सिंचनाचे प्रश्न आपणास समजल्याचे त्यांनी म्हटले.

See also  भिडे वाड्याची धोकादायक इमारत पुणे महानगरपालिकेने पाडली

              कापूस मोठ्या प्रमाणावर पिकणाऱ्या भागात सूतगिरणी चालवणे कठीण आहे. तरी गणपतराव देशमुख यांनी सांगोला सारख्या दुष्काळी भागात सूतगिरणीची स्थापना करून या भागातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध केला व अनेक संकटाचा सामना करून ही सूतगिरणी यशस्वीपणे चालवली, अशी माहिती श्री. फडणवीस यांनी देऊन वंचित कामगार शेतकरी कष्टकरी यांच्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचणाऱ्या गणपतराव देशमुख यांची राहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला बळ मिळू दे अशी प्रार्थना त्यांनी केली.

          सांगोला तालुक्यातील नागरिकांनी गणपतराव देशमुख यांना अकरा वेळा विधानसभेवर पाठवून या भागातील प्रश्नांना वाचा फोडून त्यांच्या मार्फत शासनाकडून न्याय मिळवून देण्याची मोठी कामगिरी करून घेतली असल्याचे माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा खासदार शरद पवार यांनी सांगितले. शेतकरी कामगार व वंचित घटकाबद्दल सातत्याने त्यांचे प्रश्न मांडून त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणारे गणपतराव देशमुख यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी म्हटले. त्याचप्रमाणे दुष्काळी भाग असला तरी मानाने कसे जगायचे ही कार्यपद्धती त्यांनी या भागातील लोकांच्या अंगी रुजवल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

         कोरोनामुळे जागतिक स्तरावरील अनेक उद्योग बंद झाले. सांगोला येथील सूतगिरणीलाही कोरोनाचा फटका बसलेला आहे. त्यामुळे सूतगिरणीची आर्थिक परिस्थिती नाजूक झालेली आहे. तरी शासनाने सूतगिरणीला मदत करावी. तसेच या भागातील डाळिंब पीक हे अत्यंत महत्त्वाचे असून या पिकावर सध्या रोगाचे प्रमाण वाढत आहेत, तर डाळिंब संशोधन केंद्राच्या माध्यमातून यावर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी डॉ. अनिकेत देशमुख यांनी केली.

      प्रारंभी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार शरद पवार व अन्य मान्यवरांच्या हस्ते न्यू इंग्लिश स्कूलच्या प्रांगणातील स्वर्गीय डॉ. गणपतराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. तसेच महाविद्यालयाचा नामांतरण सोहळा ही संपन्न झाला, त्यानंतर व्यासपीठावर श्रीमती रतनबाई गणपतराव देशमुख यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

     यावेळी सर्वश्री माजी आमदार  राजन पाटील, प्रशांत परिचारक, महादेव जानकर, दीपक साळुंखे पाटील, सूतगिरणीचे संचालक चंद्रकांत देशमुख, शिक्षण संस्थेचे संचालक डॉ. अनिकेत देशमुख, बाबासाहेब देशमुख यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

See also  पुणे मेहकर एसटी अपघात, मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त;मृतांच्या वारसांना एसटीतर्फे दहा लाख रुपये

      कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांच्या हस्ते स्व. गणपतराव देशमुख यांच्यावरील चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री. शिंदे यांनी केले तर आभार हनुमंत गोवरे यांनी मानले.