बाणेर : श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट, बाणेर यांच्या विश्वस्त मंडळाची त्रैमासिक सभा शनिवारी बाणेर येथे पार पडली. या सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट आजूबाजूच्या परिसरातील धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक उन्नती करण्यात नेहमीच प्रयत्नशील असते. त्या अनुषंगाने भंडारा डोंगर येथील जगतदगुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या भव्यदिव्य 150 कोटी रुपयांच्या प्रस्तावित मंदिर उभाणीच्या कामासाठी श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट बाणेर तर्फे अकरा लाख रुपयांची देणगी देण्याचे सर्वानुमते मंजूर व जाहीर करण्यात आले.
यावेळी सभेचे अध्यक्ष व ट्रस्टचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांनी सांगितले की, सन 2016 साली महाराष्ट्रात दुष्काळ पडला त्यावेळी ट्रस्ट तर्फे श्री भैरवनाथ देवस्थानचा उत्सव रद्द करून सात लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे सुपूर्द करण्यात आला होता. त्याचप्रकारे सन 2019 साली पश्चिम महाराष्ट्रात ओला दुष्काळ पडला होता, त्याचा सामना करण्यासाठी श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टतर्फे पंधरा लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात आला होता.
श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट हे आपल्या आजूबाजूच्या परिसराची सर्व प्रकारे उन्नती करण्यात यापुढेही अग्रेसर राहणार आहे व तसेच श्री भैरवनाथ मंदिराचा जिर्णोद्धार लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे सचिव डॉ दिलीप मुरकुटे यांनी दिली. यावेळी खजिनदार लक्ष्मण सायकर, हिशोब तपासनीस सागर ताम्हाणे, सल्लागार बबनराव चाकणकर, विजय विधाते आदी मान्यवर उपस्थित होते.