अपघातांच्या ‘ब्लॅक स्पॉट’चे संयुक्त सर्वेक्षण करत उपाययोजना निश्चित करा- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

पुणे : पुणे, पिंपरी चिंचवड शहर तसेच ग्रामीण भागातील सतत अपघात होणाऱ्या ठिकाणांचे (ब्लॅक स्पॉट) अपघातांची कारणे व त्याबाबतच्या माहितीचे शास्त्रीय विश्लेषण करुन अपघात रोखण्यासाठी तेथे करावयाच्या उपाययोजना निश्चित कराव्यात; त्यासाठी संबंधित महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच परिवहन आणि पोलीस विभागाने संयुक्त सर्वेक्षण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाप्पा बहीर, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर, पिंपरी चिंचवडचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे, सार्व. बांध. विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, सार्व. बांध. राष्ट्रीय महामार्गचे कार्यकारी अभियंता धनंजय देशपांडे, वाहतूक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त मच्छिंद्र खाडे आदी उपस्थित होते.

बैठकीत ‘ब्लॅक स्पॉट’ दुरुस्तीबाबत आढावा घेण्यात आला. पुणे शहरात सर्वाधिक अपघात होतात अशी माहिती यावेळी देण्यात आली. एकात्मिक रस्ते अपघात माहिती प्रणाली अर्थात ‘आयरॅड’ वरील अपघातांच्या माहितीचे विश्लेषण करुन अपघातांची कारणे व त्या ठिकाणी करावयाच्या उपाययोजनांवर विचारविनिमय करावा, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

अपघात रोखण्यासाठी संबंधित ठिकाणी करावयाच्या लघुकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना निश्चित कराव्यात. आवश्यक तेथे वेग नियंत्रणासाठी रस्त्यावर रम्बलर्स बसविणे, थर्मोप्लास्टिक रोड मार्किंग्ज, सूचना फलक, रस्त्यावरील परावर्तक, ब्लिंकर्स, रिफ्लेक्टर्स आदी उपाय योजण्यात यावेत. यासाठी ब्लॅकस्पॉट निहाय संयुक्त सर्वेक्षण करुन उपाययोजना सुचविण्यात याव्यात. सर्वेक्षणासाठी या क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञ सामाजिक संस्थांचेही सहकार्य घेण्यात यावे, असेही डॉ.देशमुख म्हणाले.

अपघातांमुळे होणारी जीवितहानी टाळण्यासाठी वारंवार अपघात होणाऱ्या ठिकाणांच्या परिसरात ‘१०८- रुग्णवाहिका सेवेतील रुग्णवाहिकांची स्थायी थांब्याची ठिकाणे ठरविणे, रुग्णालयात लवकरात लवकर अपघातग्रस्तांना पोहोचविण्याच्यादृष्टीने आपत्कालीन वाहतूक आराखडे तयार करणे यादृष्टीने कार्यवाही करावी, आदी सूचनाही यावेळी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिल्या.

पुणे जिल्ह्यात ६३ ब्लॅक स्पॉट्स आहेत असे यावेळी श्री. बहीर यांनी सांगितले. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नवले पूल येथील अपघात कमी करण्याच्यादृष्टीने अनेक उपाययोजना करण्यात आल्याने अपघातांचे प्रमाण कमी झाल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे पुणे अहमदनगर आणि पुणे-सोलापूर मार्गावरही उपाययोजना करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग, एनएचएआय तसेच ब्लूमबर्ग फिलांथ्रोपीज संस्थेच्यावतीने सादरीकरण करण्यात आले.

पुणे शहरात सन २०२० पासून अपघातांच्या संख्येत सुमारे ११३ टक्क्यांची वाढ झाल्याचे, त्यातही दुचाकी चालविणारे आणि पादचाऱ्यांचे अपघाती मृत्यूचे प्रमाण मोठे असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यादृष्टीने हेल्मेटच्या वापराविषयी अधिक जनजागृती करण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यावेळी म्हणाले.

See also  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ अंतर्गत लघु उद्योग व्यवसायासाठी थेट कर्ज योजना