शहीद जवान दिलीप ओझरकर यांना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची श्रद्धांजली!

पुणे : पुण्यातील भवानी पेठेतील जवान दिलीप बाळासाहेब ओझरकर हे कारगिल ते लेह मोहिमेवर जाताना प्रवासादरम्यान शहीद झाले आहे. आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भवानी पेठत जाऊन दिलीप ओझरकर यांच्या स्मृतिस अभिवादन केले. तसेच कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी ओझरकर कुटुंबियांना तातडीने पाच लाखांच्या मदतीसह; मुलांच्या शैक्षणिक पालकत्वाची घोषणा केली.

शहीद जवान दिलीप बाळासाहेब ओझरकर हे पुण्यातील भवानी पेठेतील भवानी माता मंदिर परिसरात वास्तव्यास होते. १५ एप्रिल २००४ रोजी ते भारतीय सैन्यात भरती झाले. मात्र दीड ते दोन वर्षांपूर्वीच ते सेवेतून निवृत्त झाले होते. मात्र, लहानपणापासून देशसेवेची इच्छा असलेल्या ओझरकर यांनी पुन्हा कालावधी वाढवून घेणे पसंत केले.

त्यानुसार, त्यांना संधी मिळाल्यानंतर कारगिल ते लेह सराव मोहिमेसाठी जाताना ३ सप्टेंबर रोजी दुपारी त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. या अपघातात दिलीप ओझरकर हे शहीद झाल्याचे माहिती ओझरकर यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली. त्यांच्यावर ५ सप्टेंबर रोजी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले.

आज पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ओझरकर यांच्या भवानी पेठेतील निवासस्थानी जाऊन दिलीप ओझरकर यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच कुटुंबियांचे सांत्वन करुन, कुटुंबियांना तातडीने पाच लाखाची मदत करुन; दोन्ही मुलांचे शैक्षणिक पालकत्वाची घोषणा केली.

ओझरकर यांना अभिवादन करताना नामदार पाटील म्हणाले की, दिलीप ओझरकर यांनी सैन्य दलात भरती झाल्यानंतर मिळालेला कार्यकाळात अतिशय समर्पित होऊन देशसेवा केली. लहानपणापासून देशसेवेसाठी समर्पित असलेल्यामुळे निवृत्तीनंतरही पुन्हा सैन्य दलात कार्य करणेच पसंत केले. दिलीपजींचा आदर्श आज प्रत्येक तरुणाने घेतला पाहिजे. त्यांच्यासारख्या समर्पित देशभक्ताला सर्व पुणेकरांचा सदैव अभिमान आहे.

See also  खरीप हंगामासाठी राज्यात खतांचा मुबलक साठा उपलब्धशेतकऱ्यांनी खतांचा समतोल वापर करावा-कृषि आयुक्त सुनील चव्हाण