प्रादेशिक संस्कृती महोत्सवात कथ्थक नृत्यातून सादर झालेल्या गणेश आणि शिवस्तुतीने वातावरण भक्तिमय

पुणे : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मृती सभागृहात सुरू असलेल्या प्रादेशिक संस्कृती महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी बडोदा येथील महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या कला शाखेच्या पथकाने केलेल्या कथ्थक नृत्याच्या सादरीकरणाने वातावरण भक्तिमय केले. रविवारी प्रसिद्ध गायिका साधना सरगम यांच्या मैफिलीने महोत्सवाचा समारोप होणार आहे.

डॉ. दीप्ती गुप्ता यांनी शिवस्तुती तर ध्रुवी मोटानी, अमिषा तिवारी, पल्लवी रॅम्बर्न या कलाकारांनी गणेशस्तुती सादर केली. यानंतर नगमा व पधंत, चतुरंग व तराणाचे सादरीकरण झाले. बद्रिया कारी यांनी सादर केलेल्या ‘सावन उत्सव’ सादरीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

आशा भोसले यांच्या सन्मानार्थ मधुरा दातार यांची मैफल
सुप्रसिद्ध पार्श्वगायिका मधुरा दातार यांनी आशा भोसले यांच्या सन्मानार्थ त्यांनी गायलेली गाणी सादर केली. आशाताईंना सप्टेंबरमध्ये ९० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या अनेक वर्षांपासून संगीत साधना करत आहे. त्यांच्या सन्मानार्थ हा छोटासा प्रयत्न असल्याचे दातार म्हणाल्या.

मधुरा दातार यांनी आशा भोसले यांनी गायलेली हिंदी आणि मराठी गीते सादर केली. या गीतांना रसिकांनी भरभरून दाद दिली.

*लोककलाकारांचे विविधरंगी सादरीकरण*
देशाच्या विविध भागातील लोककलाकारांच्या कलाविष्कारातून देशाच्या विविधरंगी संस्कृतीचे दर्शन घडले. महाराष्ट्राचा सोंगी मुखवटे, धनगरी गजा, कोळी, डांग आणि गुजरातचे सिद्धी धमाल, राजस्थानचे कालबेलिया आणि तेलंगणाचे गुसाडी नृत्याच्या सादरीकरणाच्यावेळी रसिकांनीही ठेका धरला.

रविवारी महोत्सवाचा समारोप
रविवारी प्रादेशिक संस्कृती महोत्सवाचा समारोप होणार आहे, असे पश्चिम विभागीय सांस्कृतिक केंद्राच्या संचालक किरण सोनी गुप्ता यांनी सांगितले. सायंकाळी स्वरसंगम संस्कृती मंच नागपूरतर्फे भरतनाट्यम नृत्याचे सादरीकरण होणार आहे. देशातील प्रसिद्ध गायिका साधना सरगम आपली गाणी सादर करणार आहेत.

See also  तथागत भगवान गौतम बुध्द जयंती निमित्त रंगली मंगलमय 'धम्मपहाट'