पुणे विद्यार्थी गृहातर्फे दोन दिवसीय ‘ज्ञानस्रोत’ कार्यक्रम, सलग २४ तास पेंटिग्ज, ज्ञानसंवर्धन पुरस्कार, ई-वेस्ट संकलन व क्रिकेट म्युझियमची होणार ओळख

पुणे : पुणे विद्यार्थी गृह आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील रिसर्च पार्क फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विनायक माढेकर यांच्या पुढाकारातून ‘पँटेथलॉन २०२३’ हा सलग २४ तास पेंटींग उपक्रम, ज्ञानसंवर्धन पुरस्कार, ई-कचरा संकलन व ब्लेडस ऑफ ग्लोरी क्रिकेट म्युझियमच्या विषयी माहितीपर सत्र अशा दोन दिवसीय ‘ज्ञानस्रोत’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष सुनील रेडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी विनायक माढेकर, हाऊस ऑफ सक्सेसचे प्रसाद मिरासदार, भुवनेश कुलकर्णी आदी उपस्थित होते.

सुनील रेडेकर म्हणाले, “येत्या रविवारी (ता. १ ऑक्टोबर) सकाळी १० वाजता ‘ज्ञानस्रोत’चे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मिडीया अँड कम्युनिकेशन स्टडीजच्या विभागप्रमुख डॉ. माधवी रेड्डी यांच्या हस्ते होणार आहे. सोमवारी (ता. २) सकाळी ११ वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते ‘पँटेथलॉन २०२३’चा समारोप व पेंटिग्जचे लोकार्पण करण्यात येणार आहे. तसेच विद्यापीठाच्या जयकर ग्रंथालयामध्ये व ग्रंथालय शास्त्रावर आधारित पुस्तकांचे लेखन करून महाराष्ट्रातील ग्रंथालयांना सक्षम मनुष्यबळ निर्माण करण्यामध्ये भरीव योगदान देणाऱ्या ९२ वर्षीय सुप्रसिद्ध लेखक डॉ. शां. ग. महाजन यांना ‘ज्ञानसंवर्धन पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. प्रयागराज विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मुकुल सुतावणे यावेळी उपस्थित राहणार आहेत. भुवनेश कुलकर्णी यांच्या प्रयत्नातून शिक्षणप्रेमी कै. शंकर भाऊ कुलकर्णी (बेनाडीकर) यांच्या स्मरणार्थ ज्ञानसंवर्धन पुरस्कार दिला जाणार आहे. ‘ज्ञानस्रोत’साठी रिसर्च पार्क फाउंडेशन, हाऊस ऑफ सक्सेसचे सहकार्य लाभले आहे. आयआयटी अलाहाबाद येथील प्रयागराज विद्यापीठ यांचेबरोबरही संस्थेने यासंदर्भात सामंजस्य करार केला आहे. “

सलग २४ तास पेंटिंगचा उपक्रम संस्थेच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी व जीके पाटे व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयात होणार असून, संस्थेच्या शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह अन्य संस्थाही यामध्ये भाग घेणार आहेत. उपक्रमातून जमा होणारी चित्रे, पेंटींग्ज याचे स्वतंत्र असे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. गतवर्षीप्रमाणे यावर्षी देखील विक्री होणाऱ्या पेंटिंग्जची रक्कम संस्थेस देणगी देणार असल्याचे विनायक माढेकर यांनी सांगितले.

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी दि. १ व २ ऑक्टोबरला ई-वेस्ट संकलनाचे आवाहन केले असून, महाविद्यालयामध्ये ई-वेस्ट साठवण्याची सोय करण्यात आली आहे. या माध्यमातून एकत्र होणारे ई-वेस्ट वापरून थ्रीडी प्रिंटरच्या सहाय्याने गरजू आणि रोजच्या वापरातील वस्तू बनवण्यासाठी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना विविध प्रयोग करण्यास प्रोत्साहान देण्यात येणार आहे. विविध प्रयोगातूनच ई-वेस्टचा पुर्नवापर केल्याने पर्यावरणपूरक वातावरण निर्माण करुन विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्याचा उद्देश आहे. विद्यार्थ्यांना खेळाचे महत्त्व कळावे आणि विविध खेळांची माहिती मिळावी या उद्देशाने प्रथम क्रिकेट म्युझियमच्या माध्यमातून उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. पुण्यातील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक किशोर पाटे आणि त्यांचे बंधू रोहन पाटे हे संस्थेचे मोठे देणगीदार आहेत. पाटे यांनी उभारलेल्या जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट म्युझियमची माहिती देणारा कार्यक्रम घेतला जाणार आहे. या म्युझियममध्ये क्रिकेटपटूंनी वापरलेले कपडे, क्रिडा साहित्य, बॅट, बॉल, स्टंप्स, बुट, इ. तसेच मिळालेल्या ट्रॉफीज, ग्लोव्हज, पॅडस इ. अनेक वस्तू संग्रहालयामध्ये उत्तमरित्या मांडणी करून जतन केलेल्या आहे, असेही रेडेकर यांनी नमूद केले.
—————————
पत्रकार भवन : पत्रकार परिषदेत माहिती देताना डावीकडून प्रसाद मिरासदार, विनायक माढेकर, सुनील रेडेकर व भुवनेश कुलकर्णी.

See also  शालेय शिक्षण विभागांतर्गत क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन