हवामान क्षेत्रातील अत्याधुनिक संशोधनाचा देशातील शेतकरी आणि मच्छीमारांना फायदा- केंद्रीय मंत्री रीजिजू यांचे प्रतिपादन

महाबळेश्वर येथील अतिऊंचावरील मेघ भौतिकशास्त्र प्रयोगशाळेची केली पाहणी
मुंबई -महाबळेश्वर :हवामान क्षेत्रातील अत्याधुनिक संशोधनाचा आणि त्यातून दिल्या जाणाऱ्या अंदाजाचा देशभरातील शेतकरी आणि मच्छीमारांना फायदा होत असून गेल्या 9 वर्षात या क्षेत्रात भारताने अधिक चांगली कामगिरी केल्याचे प्रतिपादन केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री कीरेन रीजीजू यांनी आज महाबळेश्वर येथे पत्रकार परिषदेत केले .महाबळेश्वर येथील अति उंचावरील मेघ भौतिकशास्त्र प्रयोगशाळेला भेट देऊन पाहणी केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला .

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे ढगफुटी आणि भुकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीचाही पुरेशा वेळेआधी अचूक अंदाज लावण्यात आपली आश्वासक वाटचाल सुरू असून नजीकच्या भविष्यात त्या संकटांची देखील पूर्वसूचना देण्यात आपल्याला यश येईल आणि संभाव्य नुकसान टाळण्यास त्याची मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला .त्यासाठी स्वदेशी बनावटीची यंत्रणा तयार केली जात असल्याचे रिजीजु म्हणाले .
देशातील सर्व पायाभूत सुविधा नैसर्गिक आपत्तीला सक्षमपणे तोड देणाऱ्या असाव्यात यादृष्टीने नियोजन सुरू असून त्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील भारताने पुढाकार घेतला असल्याचे रिजिजू यांनी सांगितले .


महाबळेश्वर हे देशातील उत्तम पर्यटन स्थळांपैकी एक असून आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र म्हणून ते नावारूपाला यावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली . इथल्या स्ट्रॉबेरी च्या उत्पादन वाढीसाठी हवामान विभाग महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास त्यानी व्यक्त केला .

खेलो इंडिया च्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात जी क्रीडा संस्कृती रुजविण्याचा प्रयत्न केला त्याचे परिणाम आशियाई स्पर्धेत दिसत असल्याचे ते म्हणाले .
तत्पूर्वी आज सकाळी रिजिजू यांनी महाबळेश्वर इथल्या अती उंचावरील मेघ भौतिकशास्त्र प्रयोगशाळेला भेट देऊन पाहणी केली .हवामानाशी संबंधित महत्त्वाच्या विविध नोंदी आणि ढगांच्या स्वरुपांच्या नोंदींचे नियमितपणे निरीक्षण करण्यासाठी पुण्यातील भारतीय उष्ण कटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेने या प्रयोगशाळेची स्थापना केली आहे. या प्रयोगशाळेत नियमितपणे केली जाणारी निरीक्षणे, ढगांचे सूक्ष्मभौतिकशास्त्र आणि ढग आणि हवेत तरंगणारे कणपुंज यांचा परस्परांशी होणारा संपर्क आणि अवक्षेप संचयन प्रक्रिया आणि संबंधित गतीशीलता विज्ञान यांचा अभ्यास करण्यासाठी सातत्याने माहिती पुरवत आहेत.या प्रयोगशाळेत ढग आणि हवेत तरंगणाऱ्या कणपुंजांचे नमुने घेणारे प्रोब, व्हिडिओ/इम्पॅक्ट डिसड्रोमीटर, जीपीएस रेडियोसोन्डे, मायक्रोवेव्ह रेडियोमेट्रिक प्रोफायलर इ. उपकरणे सातत्याने कार्यरत आहेत.

या भेटीदरम्यान रीजिजू यांनी केंद्रातील विविध विभागांची पाहणी केली आणि त्यांची कार्यप्रणाली जाणून घेतली . केंद्राचे प्रकल्प संचालक डॉ. जी . पांडिदुराई यांनी त्यांना या प्रयोग शाळेतून सुरू असलेल्या संशोधन कार्याची माहिती दिली .त्यानंतर रीजिजु यांनी केंद्रातील शास्त्रज्ञांशी अनौपचारिक संवाद साधला .

रिजिजु यांच्या हस्ते यावेळी केंद्राच्या आवारात वृक्षारोपण देखील करण्यात आले .

पार्श्वभूमी:महाराष्ट्रात महाबळेश्वर येथे अतिउंचावरील मेघ भौतिकशास्त्र प्रयोगशाळा (एचएसीपीएल)

भारतात महाराष्ट्र राज्यात पश्चिम घाटांमध्ये महाबळेश्वर(17.92oN, 73.66oE या स्थानावर आणि समुद्रसपाटीपासून 1348 मीटर उंचीवर) येथे अतिउंचावरील मेघ भौतिकशास्त्र प्रयोगशाळा (एचएसीपीएल)
हवामानाशी संबंधित महत्त्वाच्या विविध नोंदी आणि ढगांच्या स्वरुपांच्या नोंदींचे नियमितपणे निरीक्षण करण्यासाठी भारतीय उष्ण कटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, पुणे(भूविज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारितील एक स्वायत्त संशोधन संस्था) या संस्थेने एचएसीपीएल या प्रयोगशाळेची स्थापना केली.
एचएसीपीएल या प्रयोगशाळेत नियमितपणे केली जाणारी निरीक्षणे ढगांचे सूक्ष्मभौतिकशास्त्र आणि ढग आणि हवेत तरंगणारे कणपुंज यांचा परस्परांशी होणारा संपर्क आणि अवक्षेप संचयन प्रक्रिया आणि संबंधित गतीशीलता विज्ञान यांचा अभ्यास करण्यासाठी सातत्याने माहिती पुरवत आहेत.
एचएसीपीएलकडे ढग आणि हवेत तरंगणाऱ्या कणपुंजांचे नमुने घेणारे प्रोब, व्हिडिओ/इम्पॅक्ट डिसड्रोमीटर, जीपीएस रेडियोसोन्डे, मायक्रोवेव्ह रेडियोमेट्रिक प्रोफायलर इ. उपकरणे सातत्याने कार्यरत आहेत.
एचएसीपीएलची व्यापक उद्दिष्टे:

ढगांचे सूक्ष्मभौतिकशास्त्र आणि त्यांचा नैसर्गिक आणि मानवनिर्मित तरंगणाऱ्या कणपुंज द्रव्यासोबत होणारा संपर्क यांचा अभ्यास करणे.
ढग, हवेत तरंगणाऱ्या कणपुंजांची अवक्षेप संचयन प्रक्रिया आणि कणपुंज द्रव्याचे भौतिकीय-रासायनिक गुणधर्म यांच्या संकलित मोजमापांचा वापर करून हवेत तरंगणारे कणपुंज-ढग यांची अवक्षेप संचयन प्रक्रिया आणि परस्परांशी होणारा संपर्क यामधील अनिश्चितता शोधून काढणे.
दीर्घकालीन माहिती संचांचा वापर करून देशाच्या हंगामांमधील आणि हवामानविषयक भाकितांच्या मॉडेलमध्ये ढग सूक्ष्मभौतिकशास्त्र, ढग- हवेत तरंगणारे कणपुंज यांच्या होणाऱ्या परस्परसंपर्कांच्या निकषनिश्चिती प्रक्रियांमध्ये सुधारणा करणे.
एचएसीपीएलची ठळक वैशिष्ट्ये

या प्रयोगशाळेतून मोठ्या प्रमाणात मिळणाऱ्या माहितीचा वापर ढगांच्या गुणधर्मावर कणपुंजांच्या होणाऱ्या अप्रत्यक्ष परिणामांचा आणि सीसीएन आणि विविध घटकांच्या अवक्षेप संचयन प्रक्रियेवर कणपुंजांच्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी केला जात आहे.
नैऋत्य मोसमी पावसाच्या काळात दीर्घ कालीन इन-सीटू क्लाऊड प्रोब निरीक्षणांचा वापर करून ढगांच्या सूक्ष्मभौतिक गुणधर्मांचा सविस्तर अभ्यास करण्यात येत आहे.
एचएसीपीएलमध्ये नोंदणी करण्यात येणारी केंद्रस्थानातील बर्फाची मोजमापे भारतीय प्रदेशाकरिता बहुउद्देशीय केंद्रकीय बर्फ कण निकषनिश्चिती प्रक्रियेसाठी वापरली जात आहेत.
एचटीडीएमए उपकरणाचा( आकारमानावर अवलंबून नसलेली बाष्पधारणा देणारी) वापर करून विकसित केलेली सीसीएन निकषनिश्चिती सध्या सुरू आहे आणि अंकाधारित मॉडेलची चाचणी केली जात आहे.
हवेत तरंगणाऱ्या द्वितीयक सेंद्रीय कणपुंजांच्या निर्मितीमध्ये बायोजेनिक आणि ऍन्थ्रोपोजेनिक व्हीओसींच्या योगदानाचे निरीक्षण आणि मॉडेलिंग मंचाच्या वापराद्वारे मूल्यमापन केले जात आहे.
अतिउंचावरील मेघ भौतिकशास्त्र प्रयोगशाळेविषयीचा सारांश

पश्चिम घाट मान्सूनच्या हंगामात नैऋत्य वाऱ्यांना अडवतात आणि मोठ्या प्रमाणात पाण्याचा अंश असलेल्या ढगांच्या निर्मितीत आणि जोरदार पर्जन्यवर्षावाला मदत करतात.
महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश राज्यात वाहून बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणाऱ्या कृष्णा या नदीच्या पाण्याचा स्रोत महाबळेश्वर भागात आहे. कोयना, वेण्णा आणि गायत्री या प्रामुख्याने कृष्णा नदीच्या उपनद्यांचा स्रोत देखील महाबळेश्वर हा भागच आहे. सावित्री या चौथ्या नदीचा जलस्रोत देखील याच भागात आहे. मात्र ही नदी महाडमार्गे पश्चिमेच्या दिशेने वाहून अरबी समुद्राला मिळते.
अत्याधुनिक मोजमापांच्या विशेषतः उष्णकटिबंधीय भारतीय प्रदेशातील मोजमापांच्या अभावामुळे ढगांच्या निर्मितीच्या प्रक्रिया हवामानाच्या भाकितांच्या मॉडेलमध्ये योग्य प्रकारे सादर केल्या जात नाहीत.
अतिउंचावरील मेघ भौतिकशास्त्र प्रयोगशाळेच्या स्थापनेला 2012 मध्ये सुरुवात झाली आणि पाण्याचे सर्वात जास्त प्रमाण असलेल्या ढगांची आणि अवक्षेप संचयन प्रक्रियेची माहिती घेण्यासाठी सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधांसहित ती 2014 मध्ये कार्यरत झाली.
ढगांचे, तरंगणाऱ्या कणपुंजांचे आणि पर्जन्य प्रक्रियेचे निरीक्षण करण्यासाठी या प्रयोगशाळेत अत्याधुनिक उपकरणे आहेत.
या प्रयोगशाळेतून मोठ्या प्रमाणात मिळणाऱ्या माहितीचा वापर पश्चिम घाट प्रदेशातील वाऱ्याच्या मार्गातील आणि वाऱ्याच्या मार्गाबाहेरील पाणीवाहक ढगांच्या गुणधर्मांचे दस्तावेजीकरण करण्यासाठी केला जात आहे.
अंकाधारित मॉडेल्समध्ये ढगांची निर्मिती आणि संचयन प्रक्रिया सादर करण्याच्या प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी माहितीच्या संचांचा वापर केला जात आहे.
या माहितीच्या संचांचा वापर करून अनेक संशोधन प्रबंध, पीएच. डी आणि मास्टर्स प्रबंध प्रकाशित करण्यात आले आहेत.

See also  निवडणूक कालावधीत ओपिनियन आणि एक्झिट पोलला प्रतिबंध