फ्यूएल बिझिनेस स्कूलचे विद्यापीठ करण्यासाठी सहकार्य करणार-उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे : -फ्यूएल बिझिनेस स्कूल येथे विद्यार्थ्यांना व्यवस्थापनाचे दर्जेदार शिक्षण मिळत असून या संस्थेचे खासगी विद्यापीठात रूपांतर करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

भूगाव येथील फ्यूएल बिझिनेस स्कूलच्या १७ व्या वर्धापन दिन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी फ्यूएलचे संस्थापकीय अध्यक्ष केतन देशपांडे, मुख्य मार्गदर्शक संतोष हुरलीकोप्पी, मनोज पोचाट, शैलेंद्र केवडे, मयुरी देशपांडे आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले, फ्यूएल शब्दाच्या मराठी अर्थाप्रामाणे ही संस्था तरुण तरुणींना व्यवस्थापन शिक्षणासाठी ऊर्जा देण्याचे कार्य करीत आहे. संस्थेतील सुविधांचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी त्यांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी लक्षात न घेता प्रयत्नपूर्वक आपल्या पुढील शिक्षणाची वाटचाल सुरू ठेवावी.

देशात नवीन शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी होत असून मातृभाषेतील शिक्षणाला प्राधान्य देण्यात येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना विषयाचे ज्ञान चांगल्याप्रकारे होऊन त्यांची संशोधनाची वृत्ती वाढण्यास मदत होईल. तसेच नवीन शैक्षणिक धोरणात व्यवसायभिमूख शिक्षणावरदेखील भर देण्यात येत आहे.

नव्या अभ्यासक्रमात देशाचा गौरवशाली इतिहास आणि संस्कार मूल्य यावरही भर देण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या देशाचा गौरवशाली इतिहास माहिती होऊन संस्कार मूल्य कशी जपावीत याचे ज्ञानही मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी श्री. देशपांडे यांनी फ्यूएल स्कूलच्या कार्याची माहिती दिली. श्री. हुरलीकोप्पी यांनीही मनोगत व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांनी प्रातिनिधीक स्वरुपात मनोगत व्यक्त केले. उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा श्री. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ‘होम स्टोरी ऑफ फ्यूएल’ या पुस्तकाचे प्रकाशनदेखील श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

See also  अभिनव शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्यांचल हायस्कूलतर्फे  गुणवंत  विद्यार्थ्यांचा सत्कार