आधुनिक काळातील शैक्षणिक गरजेनुसार स्वामी चिंचोली येथे सुविधा देण्याचा प्रयत्न -उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : आधुनिक काळातील शैक्षणिक गरजा लक्षात घेता विद्या प्रतिष्ठानच्या स्वामी चिंचोली येथील नवीन वास्तूमध्ये सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून विद्यार्थ्यांना आधुनिक, दर्जेदार व गुणवत्तापूर्वक शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

दौंड तालुक्यातील विद्या प्रतिष्ठान संकुल स्वामी चिंचोली येथे अनंतराव पवार इंग्रजी माध्यम शाळेच्या नवीन वास्तूचे उद्घाटन व नामकरणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार दत्तात्रय भरणे, अशोक पवार, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी आमदार रमेश थोरात, ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार, सकाळचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री प्रतापराव पवार, संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, विद्या प्रतिष्ठानच्या स्थापनेच्यावेळी विविध लोकांनी मदत केली. विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या माध्यमातून गेली पाच दशके शिक्षणाची ज्ञानगंगा यशस्वीपणे घरोघरी पोचविण्याच्यादृष्टीने कार्य करण्यात येत आहे. या वाटचालीत खूप कर्तृत्ववान विद्यार्थी घडविण्याचे कार्य शिक्षक, प्राध्यापक, संस्थाचालकांनी केले आहे.

संस्थेची पुणे व पिंपरी-चिंचवड शहर, बारामती, इंदापूर आदी ठिकाणी शाखा असून यामध्ये पूर्व प्राथमिक, प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक, डीएड, बीएड, कृषी, कायदा, जैवतंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान,कृत्रिम बुद्धीमत्ता आदी विषयांचे शिक्षण देत दालने खुली करण्यात आली आहेत. सुमारे ३२ हजारापेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

विद्या प्रतिष्ठानच्यावतीने स्वामी चिंचोली येथील शैक्षणिक परिसर सुमारे २५ कोटी रुपये खर्च करुन विकसित करण्यात आला आला. या परिसराचे सुमारे १६ एकर क्षेत्रफळ असून एक लाख चौरस मीटर इतके बांधकाम करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची आवड विचारात घेऊन याठिकाणी अत्याधुनिक खेळाचे मैदान तयार करण्यात येत आहे. या संस्थेचा फायदा परिसरातील विद्यार्थ्यांना होणार आहे. संस्थेच्या माध्यमातून उत्तम प्रतीचे शिक्षण दिल्यास यापुढेही विद्यार्थी विविध क्षेत्रात निश्चित प्रगती करतील. आगामी काळात दौंड तालुक्यात विद्या प्रतिष्ठानची शाखा सुरु करण्यात येणार असल्याचेही श्री. पवार म्हणाले.

शिक्षण व सहकाराच्या माध्यमातून राज्याच्या चेहरामोहरा बदलण्याचे कार्य आपण सर्वजण काम करीत आहोत. संस्थेत अनाथ गरीब विद्यार्थ्यांला मोफत शिक्षण देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, त्यांच्या आरोग्याची काळजी, त्यांच्यामधील क्रीडागुणांना वाव देण्याबरोबर सामाजिक जाणीव वाढविण्यासाठी नेहमीच प्रयत्न करण्यात येत आहे. यापुढेही विद्याप्रतिष्ठानचे नाव देश पातळीवर कायम राहण्यासाठी आपल्याला असेच काम करायचे आहे, यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केले.

खासदार श्री. पवार म्हणाले, विद्या प्रतिष्ठानने गेल्या ५० वर्षात यशस्वी वाटचाल केली आहे. येथील विद्यार्थी देशविदेशातील विविध भागात कार्यरत आहेत. या संस्थेच्या माध्यमातून कृषी विषयाचे संशोधनात्मक शिक्षण देण्यात येत आहे. शिक्षणाचा अधिकार सर्वांना मिळाला पाहिजे, ज्ञान संपादनापासून विद्यार्थी वंचित राहता कामा नये, यासाठी अशा संस्था सुरु करण्यात आल्या आहेत. या नवीन वास्तुतून नवीन पिढीला गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे कार्य करण्यात येईल. या परिसरातील विद्यार्थीदेखील देदीप्यमान कामगिरी करत विविध क्षेत्रात भरारी घेतील. शिक्षणाच्या माध्यमातून त्यांचे जीवनमान उंचविण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी त्यांनी स्व. अनंतराव पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला.

खासदार सुळे म्हणाल्या, बारामती लोकसभा मतदारसंघात रयत शिक्षण संस्था, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ आणि विद्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना मिळत आहे. आज आरोग्य, शिक्षण सेवा यामध्ये देशात पहिल्या पाचमध्ये बारामतीचा समावेश आहे. शिक्षणाचा केंद्रबिंदू शिक्षक असतो. शिक्षक वेगवेगळ्या क्षमतेच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देत असतात, ही खुप कौतुकास्पद गोष्ट आहे, असेही श्रीमती सुळे म्हणाल्या.

शरयू फौंडेशनचे अध्यक्ष श्रीनिवास पवार यांनी स्व. अनंतराव पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला.
संस्थेचे उपाध्यक्ष श्री. प्रभुणे यांनी प्रस्ताविक केले. यावेळी स्व. अनंतराव पवार यांच्या कार्याच्या परिचय देणारा लघुपट दाखविण्यात आला.

See also  राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीला खाजगी संस्थांना सहकार्य- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील