पावसाळ्यात नुकसान झालेल्या नागरिकांना भरपाई देण्यात यावी – खासदार मेधा कुलकर्णी

पुणे  : पावसाळ्यात नुकसान झालेल्या नागरिकांना भरपाई देण्यात यावी अशी मागणी राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे मनपा आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पुण्यात पावसामुळे नागरिकांचे खूप नुकसान झाले. ज्येष्ठ नागरिक, महिला, मुले पाण्यात अडकली होती. भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली. वाहतूक कोंडीमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांचा वेळ वाया गेला हे नुकसान भरून काढता येणारच नाही.  पण चीजवस्तूंचे जे नुकसान झाले, त्याची नुकसान भरपाई व्हावी,  अशी मागणी खासदार मेधा कुलकर्णी यांनी केली आहे.

अनेक ठिकाणी घराघरांमध्ये पाणी जाऊन टीव्ही, फ्रिज आणि इतर वस्तू खराब झाल्या आहेत. अर्ध्या तासाच्या पावसामुळे पाणी मीटर रूम पर्यंत गेले. यातून काहीही अनर्थ ओढवला असता. महानगरपालिकेने आणि यंत्रणांनी याची गंभीरपणे दखल घेण्याची आवश्यकता होती.अनेक विविध गैर गोष्टींकडे झालेले दुर्लक्ष, गैरप्रकारांकडे डोळे झाक किंवा आशीर्वाद त्यातून ही दुरावस्था पुणे शहरावर ओढवली आहे. आणि आपत्कालीन परिस्थितीत मदतीची यंत्रणा कमी पडते आणि नागरिकांना स्वतःच एकमेकांच्या मदतीला धावावे लागले. महानगरपालिका पूर्णपणे अयशस्वी झाली हे पुन्हा एकदा उघड झाले आहे.  महानगरपालिका प्रशासनाने या सर्व व्यवस्था पुन्हा मुळापासून दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे.  वारंवार अशा अनेक विषयात आवाज उठवला आहे.


सर्वप्रथम अनधिकृत बांधकामांवर कारवाई करायला हवी. पावसाळी पाण्याची गटारे किती तरी ठिकाणी अस्तित्वात नाहीत, आहेत ती साफ नाहीत, काही ठिकाणी ड्रेनेज लाईन त्यात एकत्र झाल्या आहेत. त्या व्यवस्थित करायला पाहिजेत.नदीपात्राची खोली वाढवायला पाहिजे.कित्येक ठिकाणी नाले बुजवले आहेत. यासारखं तर महापाप दुसरं नसेल. या सर्व गैरव्यवस्थांमुळे नागरिकांचे नुकसान झाले. लोकप्रतिनिधी म्हणून अनेक वेळा या संदर्भात मी मागण्या केलेल्या आहेत, आवाज उठवला आहे. ज्या ज्या ठिकाणी नैसर्गिक नाल्यांवर बांधकाम केले असतील आणि अन्य काही गैरप्रकार असतील, तिथे तिथे धडक कारवाई व्हायला हवी आहे.जिथे नाल्याची रुंदी प्रायमू च्या अहवाला पेक्षा कमी आहे त्या ठिकाणी अपेक्षित रुंदी टिकवून ठेवण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे.
पाणी जमिनीत पुरण्याची व्यवस्था कुठेही नाही त्यामुळे या संदर्भात एक धोरणात्मक निर्णय घेऊन सोसायटीतील अंतर्गत रस्ते मुख्य रस्ते महानगरपालिकेच्या व अन्य खाजगी इमारती यांमध्ये जमिनीमध्ये पाणी झिरपण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग सक्तीचे करण्याचा निर्णय महानगरपालिकेला करावा लागेल असे दिसते.
तरी या सर्व विषयाची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित उपाययोजना कराव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे खासदार मेधा कुलकर्णी यांनी केली आहे.

See also  उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आर. के. लक्ष्मण फाउंडेशन आणि डॉ.होमी भाभा विद्यापीठ,मुंबई यांच्यात सामंजस्य करार