पुणे, दि. २३: सहायक आयुक्त, समाज कल्याण विभाग, पुणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वा. बुधवार पेठेतील भिडेवाडा येथे संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती समाजकल्याण विभागाने दिली आहे.
भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करून संविधान रॅलीची सुरुवात करण्यात येणार आहे. या रॅलीचा मार्ग भिडेवाडा, लाल महाल, फडके हौद दारूवाला पुल, १५ ऑगस्ट चौक ते जुनी जिल्हा परिषद असा असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, ससून रुग्णालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संविधान रॅलीचा समारोप करण्यात येणार आहे.
संविधान रॅलीत समाज कल्याण विभाग व बार्टी संस्थेच्या कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहांतील प्रवेशित विद्यार्थी, महाविद्यालयांतील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक संघटनांचे सदस्य, तृतीयपंथी व्यक्तींसाठी कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, तृतीयपंथी व्यक्ती तसेच सर्व सामाजिक क्षेत्रातील संघटना सहभागी होणार आहेत, अशी माहितीही समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांनी दिली आहे.