पुणे : केंद्र व राज्य शासनाच्या विविध शिक्षण मंडळांच्या अंतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या पश्चिम प्रांताच्या सात राज्यांच्या राष्ट्रीय उपांत्य बँड स्पर्धेचे श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे २ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता उद्घाटन होणार आहे, अशी माहिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक अमोल येडगे यांनी दिली आहे.
केंद्र शासनाचा शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, राज्य शासनाचा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, समग्र शिक्षा, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचा भाग म्हणून विविध शिक्षण मंडळांच्या अंतर्गत सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेशामधील शाळांमध्ये राष्ट्रीय शालेय पाईप बँड व ब्रास ब्रँड स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत सात राज्यातील विजेते संघ राष्ट्रीय (उपांत्य) फेरीत सादरीकरण करणार आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यादरम्यान राष्ट्रीय युद्ध स्मारक नवी दिल्ली येथे सादरीकरण करण्यासाठी या स्पर्धेतील अंतिम स्पर्धकांना आमंत्रित केले जाणार आहे.
या स्पर्धेसाठी गोवा, मध्यप्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान या राज्यासोबतच दमन व दीव, दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातील अंदाजे एक हजार स्पर्धक व मार्गदर्शक शिक्षक उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेत सात राज्यातील १८ संघ सहभागी होणार आहे. २ डिसेंबर रोजी मुलींच्या गटातील तर ४ डिसेंबर रोजी मुलांच्या गटातील पाईप व ब्रास बँड स्पर्धा होणार असून त्याच दिवशी या स्पर्धेचा समारोप होणार आहे, असेही राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या उपसंचालक डॉ. नेहा बेलसरे यांनी कळविले आहे.