पुणे : पर्यावरणाच्यादृष्टीने निसर्गाचे संवर्धन होणे ही काळाची गरज असून त्यासाठी वन विभागाच्यावतीने सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत; वन्यप्राणी जगविण्यासाठी नागरिकांनी वनव्यवस्थापनाकडे शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन वनविभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांनी केले.
कोथरुड येथील यशवंतराव चव्हाण आर्ट प्रेक्षागृह येथे जिविधा संस्थेच्यावतीने व्याघ्र प्रकल्पाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित व्याघ्र प्रकल्पविषयक प्रदर्शन व सर्वोत्कृष्ट गाईड पुरस्कार वितरणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माहिती उपसंचालक डॉ. राजू पाटोदकर, राजीव पंडित, वृंदा पंडित, ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या महिला मार्गदर्शक शहनाज बेग आदी उपस्थित होते.
गवताळ प्रदेश संवर्धनाची गरज
पुणे परिसरात मोठ्याप्रमाणात गवताळ प्रदेश असून त्याठिकाणी सफाऱ्या सुरु करीत आहोत. वन विभागाच्यावतीने टेकड्यांच्या संवर्धनासाठी उपक्रम राबवून समाजात जनजागृती करण्यात येत आहे. आगामी काळात वनसंवर्धनासाठी नागरिकांनी पुढे यावे, आपल्या सूचना, कल्पना वनविभागाला कळवाव्यात, असे आवाहन उपवनसंरक्षक श्री. मोहिते यांनी केले.
वन विभागातील मार्गदर्शक हे वनविभागाचे ब्रँड ॲम्बॅसिडर आहेत. त्यांच्याअंगी सौजन्यपूर्ण वागणूक देण्याची वृत्ती, शास्त्रशुद्ध माहिती, अंगी तळमळ असते. त्यामुळे समाजात वनविभागाच्याप्रती ते चांगली भावना घेऊन जातात, निसर्गप्रेमाचे बीज रोवण्याचे ते काम करतात. याबाबीचा विचार करता, पुणे विभागात उत्तम मार्गदर्शक निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे, असेही श्री. मोहिते म्हणाले.
व्याघ्र संवर्धनासाठी नागरिकांनी सहभागी व्हावे- उपसंचालक डॉ. राजू पाटोदकर
वाघांचे जतन करण्यासाठी शासनाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत असून अधिकाधिक नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे. वाघांच्या संवर्धनासाठी श्रीमती बेग यांच्यासारख्या महिला मार्गदर्शकांची गरज असून समाजातील महिलांनी पुढे येण्याची गरज आहे, असे आवाहन माहिती उपसंचालक डॉ. पाटोदकर यांनी केले.
व्याघ्र प्रकल्पाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त जिविधा संस्थेच्यावतीने एक आगळे-वेगळे प्रदर्शन भरविण्यात आले. वाघाच्या जतनाविषयी समाजात सकारात्मक भावना निर्माण होण्यासाठी हे प्रदर्शन महत्वपूर्ण आहे, असेही डॉ. पाटोदकर म्हणाले.
श्री. पंडित यांनी प्रास्ताविक केले. यावेळी ते म्हणाले, भारतात व्याघ्र प्रकल्पाची १९७२ साली घोषणा त्याची सुरुवात १९७३ साली करण्यात आली. या घटनेला ५० वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाला नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन श्री. पंडित यांनी केले.
यावेळी महाराष्ट्रातील पहिल्या महिला गाईड आणि ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या मार्गदर्शक शहनाज बेग यांना यावर्षीचा सर्वोत्कृष्ट गाईड पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप १० हजार रुपये रोख, पारितोषिक, मानपत्र असे आहे. या कार्यक्रमास व्याघ्रप्रेमी, निसर्ग प्रेमी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील पहिल्या महिला गाईड शहनाज बेग
शहनाज बेग या महाराष्ट्रातील पहिल्या महिला गाईड आहेत. २०१५ पासून ताडोबा अभयारण्य येथे गाईड म्हणून काम करीत असून परिसरातील इतर महिलांना प्रोत्साहन देऊन गाईड निर्माण केले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन, प्लॅस्टिक मुक्त ताडोबा यासारख्या अनेक सामाजिक कामात त्या सक्रीय आहेत. यावेळी मुलाखतकार ओंकार बापट यांनी श्रीमती बेग यांची प्रकट मुलाखत घेतली.