मध्यप्रदेश प्रमाणे महाराष्ट्रात ही डीजे बंदी करावी सुनील माने यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

नागपूर : मध्यप्रदेश सरकारने सर्वच सण उत्सव तसेच वैयक्तिक कार्यक्रमांमध्ये डीजे वाजवण्यावर बंदी घातली आहे. मध्यप्रदेश प्रमाणे महाराष्ट्राने ही आरोग्यास हानिकारक असणाऱ्या डीजेवर बंदी घालावी अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार तसेच कॅटलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील माने यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. याबाबतचे निवेदन त्यांनी ई – मेल द्वारे मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे.

सुनील माने यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हल्ली सर्वच धर्मियांच्या सण, उत्सव,महापुरुषांच्या जयंतीमध्ये, धार्मिक अथवा वैयक्तिक कार्यक्रमात डी.जे आणि लेझर लावण्याचे प्रमाण वाढले आहे. डीजेचा कर्णकर्कश्य आवाज, लेझरचा अमर्यादित वापर यामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागतो. डीजेमुळे काहींना कायमचे बहिरेपण आले आहे तर काही जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. त्याचप्रमाणे लेझरमुळे अनेकांची दृष्टी गेली आहे. यंदाच्या गणेश उत्सवानंतर डीजे आणि लेझरच्या दुष्परिणामा संदर्भातील बातम्या अनेक माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत.

त्यामुळे डीजे आणि लेझरवर बंदी घालावी यासाठी मी व शिवसेना पुणे शहर सहसंपर्क प्रमुख अजय भोसले प्रयत्नशील आहे. या विरोधात अ‍ॅड. असीम सरोदे यांच्यामार्फत आम्ही कॅटलिस्ट फाउंडेशन तर्फे मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. मध्यप्रदेश सरकारने त्यांच्या पहिल्याचा कॅबिनेट बैठकीत डीजे वर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. आपण ही महाराष्ट्रात तसा निर्णय घेऊन राज्यातील जनतेला दिलासा द्यावा. डीजे सोबतच ध्वनी प्रदूषण करणारे सर्व घटकांवर बंदी घालावी त्याचप्रमाणे लेझर तसेच प्लाज्मा लाईटवर राज्य शासनाकडून बंदी घालावी अशी विनंती त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.

See also  औंधमधील रस्ता रुंदीकरणासाठी पोलीस खात्याची जागा मिळणार - आमदार सिद्धार्थ शिरोळे