प्रा. रमेश गोपाळे यांना पुणे विद्यापीठाची पीएच.डी (विद्यावाचस्पती)पदवी प्रदान

पुणे : आकुर्डी येथील प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयातील भूगोल विषयाचे अध्यापन करणारे प्रा. रमेश गोपाळे यांना विज्ञान व तंत्रज्ञान शाखाअंतर्गत भूगोल विषयातील “अ स्टडी ऑफ पब्लिक हेल्थकेअर सिस्टिम इन पुणे डिस्ट्रिक्ट, महाराष्ट्रा – अ जॉग्राफिकल अप्रोच” या संशोधन प्रबंधासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे पीएच.डी (विद्यावाचस्पती)ही शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पदवी प्रदान करण्यात आली आहे. या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य व विज्ञान – तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर, उपप्राचार्य बी. जी. लोबो, एच. बी. सोनावणे व संशोधन केंद्राचे समन्वयक डॉ. सुचित्रा परदेशी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

त्यांचे प्राथमिक शिक्षण हे साबुर्डी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले असून, माध्यमिक शिक्षण श्री सिद्धेश्वर विद्यालय वेताळे, उच्च माध्यमिक शिक्षण रामभाऊ म्हाळगी विद्यालय कडूस, महाविद्यालयीन शिक्षण हुतात्मा राजगुरू महाविद्यालय तर पदव्युतर पदवी शिक्षण पुणे विद्यापीठातून पूर्ण केले आहे. त्याचबरोबर ते भूगोल विषयात जून २०१४ मध्ये सेट परीक्षा तर सप्टेंबर २०१५ मध्ये नेट परीक्षा उत्तीर्ण झाले व आता शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पीएचडी पदवी मिळविली आहे.

त्यांच्या घरात कुठलीही शैक्षणिक परंपरा नसताना आणि आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असताना देखील एका सामान्य, गरीब शेतकरी कुटुंबातून आलेल्या एका तरुणाने आपल्या जिद्द, चिकाटी व मेहनतीने ही पदवी मिळवली आहे. एकंदरीत या तरुणाची ही कामगिरी इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. पदवी मिळवण्यासाठी त्यांना कुटुंबीयांबरोबरच पर्वती येथील श्री शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. आपल्या ग्रामीण भागातील समाजामध्ये त्यांचे शिक्षणाविषयीचे प्रेम कौतुकास्पद आहे. त्यांना मिळालेल्या यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

See also  विविध प्रकल्प व योजनांतून देशाच्या भविष्याची पायाभरणी – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी