औंधमधील रस्ता रुंदीकरणासाठी पोलीस खात्याची जागा मिळणार – आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे – रस्तारूंदीसाठी बाधित होणारी औंधमधील पोलीस खात्याची जागा पुणे महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे, त्यामुळे रस्ता रूंदीकरणाचा प्रश्न सुटेल, अशी माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी (शनिवारी) पत्रकाद्वारे दिली.

औंधमधील रस्ता रुंदीकरणासाठी पोलीस खात्याकडून महापालिकेकडे जागा मिळविण्याकरिता पुण्याचे पालकमंत्री मा अजितदादा पवार व पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याशी शिरोळे यांनी चर्चा केली. पोलीस महासंचालक शुक्ला यांनी प्रस्तावाला मान्यता दिली असून, लवकरच त्या दृष्टीने कार्यवाही होईल आणि अनेक वर्षे प्रलंबित राहिलेला रस्तारूंदीचा प्रश्न सुटेल.

रस्तारूंदीकरणात बाधित होत असलेली पोलीस विभागाची २३ गुंठे जागा पुणे महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात येईल. त्या जागेच्या बदल्यात पुणे महापालिकेकडून पोलीस कार्यालयांसाठी २३०० चौरस मीटर क्षेत्रफळाचे बांधकाम पोलीस विभाग सुचविल त्या जागेत महापालिका करून देईल. अशा प्रकारचा प्रस्ताव महापालिकेकडे २०२० साली पाठविण्यात आला आहे. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी प्रस्तावाला मान्यता दिली असल्याने त्या दृष्टीने पोलीस आणि महापालिकेत करार होईल. ही कार्यवाही लवकरात लवकर व्हावी यासाठी पाठपुरावा करू, असे आश्वासन आमदार शिरोळे यांनी दिले.

See also  पेरिविंकलचे विद्यापीठ होण्याच्या दृष्टीने पुढचे पाऊल:10 वी 12वी निरोप समारंभात तापकीर यांचे मनोगत