पूरग्रस्त वसाहतींना बांधकामांसाठी ३ एफएसआय मिळावा – आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे ~ छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघातील पूरग्रस्त वसाहतींना गावठाणाचा दर्जा देउन बांधकामासाठी ३ एफएसआय द्यावा, अशी मागणी राज्य सरकारकडे करणार असल्याचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज जाहिर केले.
शिवाजीनगर मतदारसंघातील आशानगर आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठातील पाण्याच्या टाक्यांच्या उद्घाटनप्रसंगी शिरोळे बोलत होते. माजी महापौर मुरलीधर मोहोळ उद्घाटन कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

आशानगर आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी भारतीय जनता पक्ष कटिबद्ध होता आणि त्यानुसार टाक्यांचे काम पूर्ण करून प्रश्न मार्गी लावला आहे, असे शिरोळे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

समान पाणीपुरवठा योजनेचा निर्णय भाजपने घेतला. आशानगर येथील १२ लाख लिटर पाण्याची टाकी हा त्याचा भाग आहे. ते काम पूर्णत्वास नेले. पाणी वितरणासाठी जलवाहिन्या टाकण्यात आल्या. त्याचा फायदा २० हजारहून अधिक लोकसंख्येला होणार आहे. तसेच विद्यापीठातील टाकी ६० लाख लिटर क्षमतेची आहे, त्याचाही फायदा नागरिकांना होईल, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.

पानशेत धरण फुटल्याने १९६१ साली पूर आला. त्यातील पूरग्रस्तांचे पुनर्वसन छत्रपती शिवाजीनगर मध्ये गोखलेनगर, जनवाडी, जनवाडी ओटा, गोलघर , पांडवनगर आणि म्हाडा ची घरे, अश्या वसाहतींमध्ये करण्यात आला. तसेच पूर्ण पुणे शहरात इतर ठिकाणी जसे की शेजघर, गणेशनगर, तीन चाळ, सात चाळ, दहा चाळ, एरंडवाने, दत्तवाडी, पार्वती दर्शन, शिव दर्शन इत्यादी सुमारे आठ हजार घरांचा समावेश आहे. त्या वसाहतींचे पुनर्बांधणी आणि अन्य प्रश्न आता निर्माण झाले आहेत. ते सोडविण्यासाठी पूरग्रस्त वसाहतींना राज्य शासनाने गावठाणाचा दर्जा द्यावा. हा दर्जा मिळाल्यावर या वसाहतींचे प्रश्न मार्गी लागतील. राज्य शासनापुढे हा प्रश्न मांडला जाईल आणि पाठपुरावा केला जाईल, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला मा महापौर मुरलीधर मोहोळ, नाना भानगिरे, विनोद ओरसे, सुनीताताई वाडेकर, अनिता पवार,दत्ता भाऊ खाडे,रवी साळेगावकर, गणेश बगाडे, आनंद छाजेड, प्रकाश ढोरे,आदित्य माळवे,राजश्री काळे, मुकारी अलगुडे, सुधीर आल्हाट रमाताई कापसे,पराग गायकवाड,अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

See also  कालबध्द वेळापत्रकाद्वारे अनुकंपा भरती प्रक्रिया राबवावी -विभागीय आयुक्त सौरभ राव