भाजपाच्या जाहिरनाम्यात संविधानाची गॅरंटी नाही : डॉ. नितीन राऊत

पुणे : भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला विघातक वातावरणाकडे घेऊन जात आहेत. विरोधातील आवाज दाबले जात आहेत. एक प्रकारची हुकूमशाही देशात चालू आहे. भाजपाने अब की बार ४०० पार ही घोषणा देशाचे संविधान बदलण्यासाठीच दिली आहे. संविधान बदलण्यासाठी त्यांनी अनेकदा प्रयत्न केले आहेत. भाजपा एकीकडे सांगतात की संविधान बदलणार नाही व आरक्षण रद्द करणार नाही, परंतू दुसर्‍या बाजूला मोदी सर्व प्रकारची गॅरंटी देत आहेत, मात्र त्यांच्या जाहिरनाम्यात संविधानाची गॅरंटी नाही. त्यामुळेच त्यांचा डाव संविधान बदलण्याचा असल्याचा दिसत आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज कॉंग्रेस भवन येथे केले.

पुणे लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या निवडणुक प्रचाराकरिता डॉ. नितीन राऊत पुण्यात आले आहेत. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी, अनुसूचित जाती-जमातीचे शहराध्यक्ष सुजीत यादव, गौतम वानखेडे, माध्यम समन्वयक राज अंबिके व अन्य उपस्थित होते.

यावेळी डॉ. राऊत म्हणाले कि यावेळी संपूर्ण देशात अंडर करंट दिसून येत आहे. उत्तर प्रदेश सहित अन्य राज्यांमध्ये ही स्थिती आहे. आतापर्यंत तीन टप्प्यांचे मतदान पार पडले आहे. यामधून भाजपा विरोधी वातावरण स्पष्टपणे जाणवत आहे. याची जाणीव झाल्यानेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मानसिकता बिघडलेली दिसत आहे. त्यांची वक्तव्ये पाहता त्यांना पराजित होण्याची मोठी चिंता दिसत आहे. पुण्यामध्ये देखील कॉंग्रेस तसेच महाविकास आघाडीच्या बाजूने वातावरण आहे. कॉंग्रेसने दिलेल्या उमेदवारात जनतेला आपला प्रतिनिधी दिसत आहे, दूसर्‍या बाजूला उच्चभ्रू वर्गासाठी काम करणारा उमेदवार आहे. भाजपा व नरेंद्र मोदी विरोधात राग लोकांमध्ये दिसून येत आहे. लोक बोलताना दिसत नाही, मात्र मतदानातून हा राग बाहेर पडलेला दिसणार आहे.

डॉ. राऊत यांनी राज्य सरकार वर टिका करताना म्हटले कि एससी, एसटी विद्यार्थ्यांना विदेशी विद्यापीठांमध्ये शिक्षणाकरिता दिल्या जाणार्‍या शिष्यवृत्तीसाठी उत्पन्नाची अट लावली, हा अतिशय चुकीचा निर्णय आहे. यामुळे बर्‍याच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार नाही. राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकार दलित व मागासवर्गीयांचे आरक्षण संपुष्टात आणण्याचे कारस्थान करत आहेत. संविधानाला संपुष्टात आणण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहेत.

See also  न्यायदानाची बदललेली संकल्पना म्हणजे “न्याय आपल्या दारी” – सरन्यायाधीश डॉ. धनंजय वाय चंद्रचूड