पुणे, दि. १४: मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, तसेच नवयुवा मतदारांची अधिकाधिक प्रमाणात नोंदणी करावी, असे निर्देश मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी महसूल उपायुक्त आण्णासाहेब चव्हाण, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, उपजिल्हाधिकारी तथा स्वीप समन्वयक अधिकारी अर्चना तांबे, विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
डॉ. पुलकुंडवार म्हणाले की, निवडणूका पारदर्शक आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण, शुद्धीकरण अत्यंत महत्वपूर्ण आहे. यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम (दुसरा) राबविण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी नवीन मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहे. तसेच मतदान केंद्रांची जागा बदलण्यात आली आहे. याठिकाणच्या मतदारांना मतदान केंद्र बदलल्याची माहिती कळविण्यात यावी.
मतदार यादीमध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी राहणार नाही व एकही पात्र मतदार येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये मतदानापासून वंचित राहणार नाही याची खात्री मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी करावी. ऐनवेळच्या तक्रारी टाळण्यासाठी प्रारूप यादीमध्ये आपले नाव आहे किंवा नाही याची मतदारांनी खात्री करणे आवश्यक आहे. तसेच मतदार यादीतील आपले नाव, पत्ता, लिंग, जन्म दिनांक, वय, ओळखपत्र क्रमांक, मतदारसंघ आदी तपशिलदेखील अचूक असल्याबाबत खात्री करणे आवश्यक आहे.
विधानसभा निवडणुका २०२४ च्या अनुषंगाने सर्व उपविभागीय अधिकारी हे त्या त्या विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत तर तहसीलदार हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी असतील. आपल्या अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रीय अधिकारी, मतदान केंद्र अधिकारी तसेच या प्रक्रियेत समाविष्ट प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्याला नेमून दिलेल्या कामकाजाचे व जबाबदारीचे सर्व प्रशिक्षण व्यवस्थित होईल याकरता अत्यंत तज्ञ प्रशिक्षक नियुक्त करावेत, असे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले.
मतदार माहिती चिठ्ठी प्रत्येक मतदारापर्यंत विहित कालावधीत १०० टक्के वितरित होईल यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करावे. यासाठी राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनीही मदत करावी. मतदानाच्या अगोदर किमान 3 दिवस मतदार माहिती चिठ्ठी वितरण होणे आवश्यक आहे. मतदार यादीत महिलांचे लिंग गुणोत्तर प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. निवडणूक प्रक्रिया सुलभपणे पार पाडण्यासाठी प्रत्येकाने पारदर्शकतेने आणि अचूकपणे कामे करावीत, असे आवाहन डॉ.पुलकुंडवार यांनी केले.
मतदान प्रकियेत 18 ते 19 आणि 20 ते 29 या या वयोगटातील युवकांचा सहभाग लोकसंख्येच्या प्रमाणात कमी आहे, यावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. मतदार यादीतील दुबार व मयत, नावे, पत्ता व छायाचित्रे समान असलेली नावे कमी करण्याची प्रक्रिया राबवावी. नावे वगळताना नीटपणे पडताळणी करून घ्यावी. सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा असतील याची मतदार नोंदणी अधिकारी यांनी स्वत: मतदान केंद्रांना भेट देवून खात्री करावी
राजकीय पक्षासोबत समन्वय साधून विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेत त्यांना सक्रीय सहभागी करून घ्यावे अशा सूचना त्यांनी केल्या. राजकीय पक्षांनी आपल्यास्तरावर असलेल्या सूचना किंवा तक्रारी निवडणूक यंत्रणेला कळवाव्यात. त्याची संबंधित यंत्रणेने दखल घेऊन कार्यवाही करावी, असेही निर्देशही त्यांनी दिले.
जिल्हाधिकारी डॉ. दिवसे म्हणाले, ६ ऑगस्ट रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये प्रारूप यादी प्रकाशित करण्यात आली आहे, तसेच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीना देण्यात आली आहे. राज्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक मतदार आहेत. मतदार नोंदणीसाठी जिल्ह्यात सुमारे ७ लाख अर्ज आले असून यावेळी ४ लाख नवीन मतदार वाढण्याचा अंदाज आहे. मतदार यादी मध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी राहणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. शहरात दुबार नावे व मयतांची नावे वगळण्यासाठी महानगरपालिका व नगरपालिकेचे सहाय्य घेण्यात येत आहे.
जिल्ह्यात मतदार नोंदणी जनजागृतीकरीता स्वीप कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रमाचे आयोजन करून मतदार नोंदणीसाठी आवाहन येत आहे. मतदार नोंदणीसाठी सहकारी गृहनिर्माण सोसायटीत मेळावे, महाविद्यालयात राजदूतांची नियुक्ती करण्यात आली आहे. महिला, कामगार, युवक, दिव्यांग, तृतीयपंथीय आदी घटकांकरीता मेळाव्याचे आयोजन करुन मतदार नोंदणी करण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात वारंवार राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेण्यात येत आहे, असे सांगून मतदार माहिती चिठ्ठी वितरणासाठी राजकीय पक्षांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी सादरीकरणाद्वारे विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रमात मतदार नोंदणी, दुरूस्ती व वगळणीसाठी करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.
यावेळी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी मतदार यादीच्या अनुषंगाने सूचना मांडल्या.
घर ताज्या बातम्या विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडून विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा आढावा