बाणेर-बालेवाडी- पाषाणमधील समस्यांसंदर्भात ना. चंद्रकांतदादा पाटील यांची आयुक्तांसोबत बैठक

बाणेर : बाणेर- बालेवाडी-सुतारवाडी-पाषाण-सोमेश्वरवाडी भागातील विविध समस्यांसंदर्भात नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज पुणे महापालिका आयुक्तांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी बालेवाडी-वाकड रस्त्याचे काम जलदगतीने पूर्ण करावे, असे निर्देश नामदार चंद्रकांतदादा पाटील आज दिले‌. तसेच, सुतारवाडीतील पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या नादुरुस्त असल्याने त्या तातडीने दुरुस्त कराव्यात, त्यासाठी आमदार निधीतून तरतूद करु असे सूचित केले.

यावेळी भाजप कोथरुड उत्तरचे अध्यक्ष सचिन पाषाणकर, भाजपा पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, भाजपा नेते लहू बालवडकर, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, प्रकाश तात्या बालवडकर, राहुल कोकाटे, सचिन दळवी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबुराव चांदोरे यांच्या सह भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांना जोडणाऱ्या मुळा नदीवरील वाकड ते बालेवाडी पुलाचे काम सुरू आहे. पुलाचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. मात्र पुण्याकडील बाजूच्या ३०० मीटरच्या रस्त्याचे काम जमीन संपादनाच्या प्रक्रियेतील अडथळ्यांमुळे अपूर्ण आहे. ही जागा तडजोडीने ताब्यात घेण्याची प्रक्रिया महापालिका प्रशासनाकडून सुरू असल्याची माहिती माननीय मुख्यमंत्र्यांनी विधानभवनात दिली होती‌. सदर प्रक्रीया जलदगतीने पूर्ण करुन, रस्त्याचे काम पूर्ण करावे असे निर्देश दिले.

यासोबतच जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. मुसळधार पावसामुळे पाषाण, सुतारवाडी मधून वाहणाऱ्या रामनदीला पूर आला. त्यातच पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या बंद असल्याने सर्व पाणी स्मशानभूमीत भरले होते. त्यामुळे पाण्याचा निचरा करणाऱ्या वाहिन्या तातडीने दुरुस्त कराव्यात; त्यासाठी आमदार निधीतून तरतूद करण्यात येईल, अशी सूचना ही त्यांनी यावेळी केली. पावसाचा जोर ओसरला असून; बाणेर-पाषाण लिंक रोडच्या ३६ मीटरचे काम जलदगतीने पूर्ण करावे असे निर्देश दिले. तसेच, आयवरी इस्टेट ते सोमेश्वर वाडी निम्हण मळा या रस्ताचे कामही जलदगतीने पूर्ण करावे अशी सूचना केली.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पाषाण-सूस रोड येथील कचरा संकलन केंद्र बंद करुन; नांदे येथील पीएमआरडीएच्या जागेत स्थलांतरित करण्यात येत आहे. या प्रकल्पाचे कामही अंतिम टप्प्यात असून, यामुळे बाणेर-बालेवाडी-पाषाण-सूस मधील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. त्याबद्दल नामदार पाटील यांनी समाधान व्यक्त केले. तसेच, कोथरुड मधील करिश्मा सोसायटीला अपूरा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे त्यांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करावा, कसेही निर्देश दिले.

See also  ‘मन की बात’च्या शतकीय संवादाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !