चिंचवड विधानसभा मतदारसंघ भाजपा अंतर्गत राजकीय उलथापालथ होण्याच्या चर्चा

पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदार संघामध्ये सध्या भाजपा अंतर्गत मोठी राजकीय उलथापालथ सुरू असल्याच्या चर्चा सातत्याने ऐकायला मिळत आहेत. दोन दिवसापूर्वी माजी नगरसेवक संदीप कस्पटे यांनी भाजपाचा राजीनामा दिल्यानंतर विद्यमान आमदार अश्विनी जगताप या आपल्या समर्थक नगरसेवकांसह तुतारी फुंकणार असल्या बाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चा होत आहे.

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी असलेला एक मोठा वर्ग विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांच्या सोबत आहे. अश्विनी जगताप यांच्या गटातील नगरसेवकांपैकी असलेले काही भाजपचे नगरसेवक हे देखील आपली प्रबळ दावेदारी सांगत चिंचवड विधानसभेच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत.

भाजपा अंतर्गत दबाव निर्माण करण्यासाठी चिंचवड विधानसभा मतदारसंघांमध्ये जोरदार मोर्चे बांधणी सुरू असून या मोर्चेबांधणीचाच एक भाग म्हणजे राजीनामा सत्र व विद्यमान आमदार सुधारित जाण्याच्या चर्चा असल्याचे बोलले जात आहे.
आमदार अश्विनी जगताप या अद्याप तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या संपर्कात असल्याचे कोणतेही अधिकृत वृत्त समोर आलेले नाही. अथवा शरद पवार यांची भेट झाल्याचे दिसून आले नाही. यामुळे अश्विनी जगताप तुतारी हाती घेतील ही भूमिका सध्या तरी राजकीय दबावाचा भाग असल्याचे राजकीय जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे.

पोट निवडणुकीमध्ये शंकर जगताप यांनी आपली दावेद्वारे मागे घेत अश्विनी जगताप यांना पाठिंबा देत निवडून आणले होते. या पार्श्वभूमीवर शंकर जगताप यांना भाजपाने शहराध्यक्ष पदाची धुरा दिली होती. चिंचवड विधानसभा मतदार संघातील भाजपाचे प्रबळ दावेदार म्हणून शंकर जगताप यांचे नाव समोर येत असून त्यांची उमेदवारी ही जवळपास निश्चित झाल्याचे मानले जात आहे. यामुळे आमदार अश्विनी जगताप यांच्या समर्थकांमध्ये काहीसे नाराजीचे वातावरण असून शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्वाखाली एक मोठा नगरसेवकांचा वर्ग शंकर जगताप यांच्या उमेदवारीला विरोध करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.

भाजपा अंतर्गत असलेली रस्सीखेच सध्या नगरसेवकांचे राजीनामे, आमदारांच्या भेटीगाठी, तसेच चिंचवड विधानसभेवर माजी नगरसेवकांमधून सुरू असलेली तयारी यातून सातत्याने पुढे येत आहे. हा संघर्ष भाजपाला येणाऱ्या विधानसभेमध्ये निश्चितच डोकेदुखी ठरणार असून भाजपा यातून कसा मार्ग काढणार की चिंचवड विधानसभा मतदार संघातून तुतारीला समर्थन मिळणार हे पाहणे आगामी काळात उत्सुकतेचे ठरणार आहे.

See also  पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ‘कमवा आणि शिका’ योजनेचा शुभारंभ