बालेवाडी परिसरामध्ये रात्रीच्या अंधारात विनापरवाना रस्ता खोदकाम करून बुडवला जातोय पालिकेचा कोट्यावधीचा महसूल

बालेवाडी : बालेवाडी परिसरामध्ये अनेक ठिकाणी मोठमोठ्या इमारतींचे बांधकाम चालू आहेत त्यामुळे परिसरामध्ये अनेक ठिकाणी केबल व्यावसायिक तसेच विद्युत केबल टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणात रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत अनधिकृत रित्या रस्त्यांची खोदाई करण्यात येत आहे. कोणत्याही प्रकारे रस्त्याची खोदाई करण्यासाठी पुणे महानगरपालिकेची परवानगी घेणे आवश्यक असते परंतु हे व्यवसायिक आपल्या आर्थिक फायद्यासाठी पुणे महानगरपालिकेची कोणत्याही प्रकारे परवानगी न घेता रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत मोठ्या प्रमाणात खोदाई करतात यामुळे महानगरपालिकेचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडवला जात आहे.

अशाच प्रकारे बालेवाडी येथील एफ रेसिडेन्सी च्या जवळ विद्युत केबल टाकण्यासाठी तेथील व्यावसायिकाने महानगरपालिकेची कोणत्याही प्रकारे परवानगी न घेता रात्री वरदळीच्या वेळात रस्ता खोदाई केल्याच्या तक्रार परिसरातील नागरिकांनी केल्या. यावेळेस परिसरातील नागरिकांनी खोदाई ची परवानगी आहे का असे विचारले असता खोदकाम करणाऱ्या ठेकेदारांनी नागरिकांना देखील दमदाटी केली. तसेच आपल्याला महानगरपालिकेचे परवानगी आहे असे खोटे नागरिकांना सांगितले परंतु नागरिकांनी या संदर्भात महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना तक्रार केल्यावर सदर खोदकामाला परवानगी देण्यात आली नव्हती ही बाब निदर्शनास आली.  या कामावरील कर्मचाऱ्यांनी पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना देखील उर्मटपणे उत्तरे दिली व आपले खोदकाम तसेच पुढे चालू ठेवले. काही वेळानंतर महानगरपालिकेचे अधिकारी आल्यावर या खोदकाम करणाऱ्या कामगारांनी खड्डे तसेच ठेवून तेथून पळ काढला.

याबाबत स्थानिक नागरिकांनी सांगितले की, या ठिकाणी वेळोवेळी अशा प्रकारे बांधकाम व्यवसायिक परवानगी न घेता मोठ्या प्रमाणात कामे करतात तसेच त्यांना नागरिकांनी हटकल्यास नागरिकांना दमदाटी करतात . त्यामुळे अशा व्यवसायिकांवर कडक कारवाई करण्यात यावी.

पुणे महानगरपालिकेच्या पथ विभागाच्या अधिकाऱ्यांशी याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की एफ रेसिडेन्सी शेजारी ज्या ठिकाणी खोदाई करण्यात आली आहे. त्यास कोणत्याही प्रकारे परवानगी देण्यात आली नव्हती त्यामुळे त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल व महानगरपालिकेच्या नियमानुसार दंड आकारण्यात येईल.

See also  मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग (मिसिंग लिंक) प्रकल्प सप्टेंबर २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन-मंत्री दादाजी भुसे