खडकवासला : डोणजे( ता. हवेली) येथील गोळेवाडी पासून आपलं घर आणि कौशल्या कराड ग्रामीण रुग्णालयाला जोडणाऱ्या अरुंद रस्त्यावर कॉंक्रिटीकरण चालू असल्यामुळे एका चडावर पाण्याने भरलेला टँकर घसरून गायींच्या गोठ्यावर पलटी झाला. या अपघातात दोन गाय जखमी झाल्या असून गोपालक शेतकरी प्रसंगावधानाने वाचला आहे. तर गोठ्याचे आणि टँकरचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाच्या गुणवत्तेचा आणिमजबुती करणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
डोणजे परिसरातील गोळेवाडी येथे मुख्य सिंहगड रस्त्याला जोडणारा आपलं घर आणि कौशल्य कराड ग्रामीण रुग्णालयाला जोडणाऱ्या तीन किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण सध्या सुरू आहे. डोंगर उतारावरून आणि वनविभागाच्या हद्दीतून जाणारा हा रस्ता अरुंद आहे. या रस्त्याला लागून स्थानिक शेतकऱ्यांच्या मिळकती आणि शेती आहे. तेथील काही शेतकऱ्यांचे दूध उत्पादनासाठी गोठे आहेत. गोळेवाडी येथील मुख्य सिंहगड रस्त्यापासून एक किलोमीटर अंतरावर शंकर रघुनाथ गोळे यांच्या गोठा रस्त्याला लागून आहे. त्याठिकाणी अरुंद आणि चढउताराचा रस्ता असून रस्त्यावरील एका बाजूचे काम चालू असल्याने वाहतूक जाताना डाव्या बाजूने सध्या सुरू आहे. या रस्त्यावर इतका आरूंद आहे की मोठी वाहने जाणे म्हणजे धोकादायक आहे. तरीही वाहतुकीची गरज म्हणून पर्यायी रस्ता नसल्याने जीव धोक्यात घालून तेथील वाहतूक सध्या सुरू आहे. या गोठ्यासमोर दहा-बारा फूट उंचीच्या चडाचा रस्ता असून त्याचे कॉंक्रिटीकरणाचे काम करण्यासाठी मजबुतीकरणही केलेली नाही किंवा संरक्षक भिंतही बांधलेली नसून साधा मातीचा आणि मुरमाचा भराव घातला आहे. सोमवारी सायंकाळी आपलं घर आणि कौशल्य कराड ग्रामीण रुग्णालयाला पाणी पुरवठा करण्यासाठी या चडावरून जात असल्या टँकर भरावावरून घसरून खाली असलेल्या गोठ्यावर पलटी झाला याच वेळेस या गोठ्यामध्ये अनेक गाय होत्या. त्यापैकी रस्त्याच्या बाजूला असलेल्या दोन गाई जखमी झाल्या तर गाईंची धार काढणारा गोपालक शेतकरी शंकर गोळे प्रसंगावधान राखत वेळीच बाजूला झाल्याने बालमबाल बचावला आहे. तर गोठ्याचे आणि पलटी झालेल्या टँकरचे मोठे नुकसान झाले आहे.
अपघात घडल्यानंतर डोणजे ग्रामपंचायतचे सदस्य तेजस कोडीतकर आणि सरपंच रोहिणी कुंभार यांनी तातडीने घटनास्थळाला भेट देऊन अपघाताची पाहणी केली. कोडीतकर यांनी रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदार अशी संपर्क साधून झालेल्या अपघाताचे गांभीर्य लक्षात घेऊन काम करावे असे सूचना करण्यात आले असल्याचे सांगितले तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता नामदेव राठोड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी घटनास्थळाला प्रत्यक्ष भेट दिल्यानंतरच निर्णय घेण्यात येईल असे सांगितले. तथापि मंगळवारी दिवसभरात त्यांची घटनास्थळाला भेट झाली नसल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी आणि गोठा मालकाने सांगितले.